महाराष्ट्र संघाची वादळी फलंदाजी, नऊ विकेटने विजय

  • By admin
  • November 14, 2025
  • 0
  • 102 Views
Spread the love

नीरज जोशी, सागर पवारची आक्रमक अर्धशतके 

रांची ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर २३ एकदिवसीय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्तराखंड संघावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवत आगेकूच केली. सागर पवार आणि नीरज जोशी यांची आक्रमक अर्धशतके विजयाची वैशिष्ट्य ठरली. 

टॉरियन वर्ल्ड स्कूल मैदानावर हा सामना झाला. उत्तराखंड संघाने प्रथम फलंदाजी करत ३६.३ षटकात सर्वबाद १२० धावा काढल्या. महाराष्ट्र संघाच्या प्रभावी गोलंदाजीसमोर उत्तराखंडचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. कर्णधार हर्ष राणा याने सर्वाधिक ३८ धावांचे योगदान दिले. त्यामुळे संघाला धावांचे शतक पार करण्यात यश आले. अनमोल (१९), देवांश (२१), नेगी (१५) व लिंक (१२) यांनी धावांचा दुहेरी आकडा गाठला.

महाराष्ट्र संघाकडून शुभम मैड याने ३४ धावांत तीन विकेट घेऊन सामना गाजवला. अजय बोरुडे याने ९ धावांत दोन विकेट घेऊन आपली चमक दाखवली. प्रथमेश गावडे (१-१५), रोशन वाघसारे (१-२६), नीरज जोशी (१-१७) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

महाराष्ट्र संघासमोर विजयासाठी केवळ १२१ धावांचे आव्हान होते. महाराष्ट्र संघाने अवघ्या ११.४ षटकात एक बाद १२२ धावा फटकावत नऊ विकेटने सामना जिंकला.
सागर पवार आणि नीरज जोशी या सलामी जोडीने आक्रमक फलंदाजी करुन संघाचा मोठा विजय निश्चित केला. सागर व नीरज या जोडीने ९.२ षटकात १०५ धावांची भागीदारी करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 
सागर पवार याने ३२ चेंडूत ५२ धावांची दमदार खेळी केली. सागरने अर्धशतकी खेळीत आठ चौकार व तीन उत्तुंग षटकार मारले. नीरज जोशी याने ३० चेंडूत नाबाद ६७ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी साकारली. नीरजने तुफानी फलंदाजी करताना तब्बल ८ षटकार ठोकले व चार चौकार मारले. नीरजच्या वादळी फलंदाजीने संघाचा विजय अधिक सोपा झाला. किरण चोरमले याने नाबाद २ धावा काढल्या. डीपी सिंग याने सागरचा एकमेव बळी टिपला.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *