कुडो वर्ल्ड कप स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक
मुंबई ः मध्य प्रदेशातील सागर शहरातील कुडोपटू सोहैल खान – देशाचा गोल्डन बॉय – याने बल्गेरिया येथे झालेल्या कुडो वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकून भारताचा मान उंचावला.
या अतुलनीय यशानंतर मुंबईत आयोजित विशेष सोहळ्यात अक्षय कुमार, डिंपल कपाडिया आणि जॅकी श्रॉफ यांनी सोहैल आणि त्याचे प्रशिक्षक डॉ. मोहम्मद एजाज खान यांचा गौरव केला.
अक्षय कुमार यांनी सोहैलच्या सातत्य, शिस्त आणि देशासाठीच्या समर्पणाचे कौतुक करत त्याला “भारताच्या नव्या पिढीतील लढवय्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व” असे संबोधले. प्रशिक्षक डॉ. ऐजाज खान यांनी सांगितले की, “छोट्या शहरातूनही जागतिक स्तरावर पोहोचता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सोहैल.”
तरुणांना संदेश देताना सोहैल खान म्हणाला, “तुम्ही कुठून आला आहात यापेक्षा तुम्ही कुठे पोहोचता हे महत्त्वाचे.”
वर्ल्ड कपनंतर सोहैलने आशियाई कुडो चॅम्पियनशिप २०२५ (टोकियो) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली.
२०१७ चा विश्वविजेता, २२ वेळा राष्ट्रीय विजेता आणि सहा वेळा आंतरराष्ट्रीय सुवर्णविजेता असलेल्या सोहैल खानची कहाणी भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


