५० लाखांचा धनादेश सुपूर्द करुन पदाधिकाऱयांतर्फे सन्मान
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या सुवर्णयशामध्ये महाराष्ट्राची कन्या स्मृती मानधना हिने बजावलेली भूमिका अत्यंत निर्णायक आणि उल्लेखनीय ठरली.
स्मृती मानधनाच्या या असामान्य कामगिरीच्या गौरवार्थ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे तिला ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करून सन्मानित करण्यात आले आहे.
मानधनाची विश्वचषकातील चमकदार कामगिरी
स्मृती मानधनाने संपूर्ण स्पर्धेत उच्च दर्जाची व सातत्यपूर्ण फलंदाजी करत ५४.२५ च्या सरासरीने ४३४ धावा नोंदवल्या. ती विश्वचषकातील दुसरी सर्वोच्च धावा करणारी खेळाडू ठरली. विशेषतः, न्यूझीलंडविरुद्ध लीग सामन्यात तिने खेचलेले शतक आणि तिला मिळालेला ‘सामनावीर’ पुरस्कार भारताच्या विजयी मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरला.
मान्यवरांकडून कौतुक
या प्रसंगी एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी भारतीय महिला संघाच्या कामगिरीबद्दल आणि स्मृती मानधनाच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. रोहित पवार म्हणाले की, “भारतीय महिला क्रिकेट संघाने केलेली विलक्षण कामगिरी ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. स्मृती मानधनाची सातत्य, निर्धार आणि सामनावीर प्रदर्शन ही भारताच्या विश्वविजयात मोलाची ठरली.
तिचा गौरव म्हणून ५० लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. तिने पुढील पिढ्यांसाठी नवे आदर्श आणि मानदंड निर्माण केले आहेत. यासोबतच, रोहित पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचेही आभार मानले. त्यांच्या मते, पुरुष तसेच महिला खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा, संधी आणि प्रगतीसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यात बीसीसीआय सातत्याने उत्तम कामगिरी करत आहे.
स्मृती मानधनाची कृतज्ञता
हा सन्मान स्वीकारताना स्मृती मानधना म्हणाली, “मी माझ्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात महाराष्ट्राकडून एज-ग्रुप क्रिकेट खेळून केली आणि महाराष्ट्राची खेळाडू असल्याचा मला सदैव अभिमान आहे .” तिने एमसीए अध्यक्ष रोहित पवार आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
तिने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे महिला क्रिकेटपटूंसाठी सुरू असलेले काम विशेषत्वाने नमूद केले, ज्यामध्ये महाराष्ट्र विमेन्स प्रीमियर लीगची सुरुवात आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या संघाने जिंकलेली सीनियर विमेन्स टी-२० ट्रॉफी याचा उल्लेख केला.
कार्यक्रमास मान्यवर उपस्थित
या गौरव सोहळ्याला माजी अध्यक्ष अजय शिर्के, अपेक्स परिषदेचे चेअरमन सचिन मुळे, एमसीएचे सचिव कमलेश पिसाळ, सहसचिव संतोष बोबडे, कोषाध्यक्ष संजय बजाज तसेच राजू काणे तसेच एमसीएच्या सर्व मान्यवर एपेक्स कौन्सिल सदस्यांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी स्मृती मंधनाला शुभेच्छा देत तिचा गौरव केला.
याआधी, महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला संघाने सीनियर विमेन्स टी-२० ट्रॉफी जिंकल्याबद्दल एमसीएतर्फे संघाला ४० लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राज्यातील महिला क्रिकेटपटूंच्या विकासासाठी, उत्कृष्ट सुविधा, प्रशिक्षण आणि दीर्घकालीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे.



