छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे नळदुर्ग येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन मुलींच्या खो-खो स्पर्धेत पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मुलींनी उत्कृष्ट खेळ कौशल्य प्रदर्शन करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. स्पर्धेत दमदार खेळ करत संघाने रौप्य पदकाची कमाई केली.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पीईएस महाविद्यालयाचा सामना देवगिरी महाविद्यालयाशी झाला. या सामन्यात पीईएसच्या खेळाडूंनी आक्रमक आणि अचूक खेळशैली दाखवत १० विरुद्ध २ अशी प्रभावी गुणफरकाने मात केली. या विजयामुळे संघाने आत्मविश्वासाने अंतिम सामन्यात प्रवेश केला.
अंतिम सामना एस सी महाविद्यालय, नळदुर्ग यांच्याशी अत्यंत रोमांचकारी वातावरणात झाला. दोन्ही संघांनी जबरदस्त झुंज दिली; परंतु थोडक्यात पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाला पराभव स्विकारावा लागला आणि त्यांनी रौप्य पदकावर समाधान मानले.
संघात पूजा फारगडे, गीतांजली नरसाळे, प्राची कर्डिले, माधुरी पेलमहाले, नीता वेलकर, साक्षी वसावे, विशाखा वायाळ, वैशाली चव्हाण आणि ऋतुजा जाधव यांचा समावेश होता. या खेळाडूंना पूजा साळुंखे यांचे कुशल मार्गदर्शन लाभले, तर बाबुराव जाधव यांनी संघव्यवस्थापक म्हणून प्रभावी जबाबदारी पार पाडली.
या उल्लेखनीय यशानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी यांनी सर्व खेळाडूंचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही संघाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


