छत्रपती संभाजीनगर ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी क्रीडा संकुलात आयोजित शालेय राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्यूदो संघटनेच्या एमआयडीसी वाळूज येथील बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या श्रीमती परमेश्वरी देवानी ज्यूदो प्रशिक्षण केंद्रातील सांची सोनवणे या खेळाडूने ज्यूदो खेळाचे शानदार प्रदर्शन करत महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक मिळवला.
एमआयडीसी वाळूज येथील कामगार वस्तीत राहणारी सांची सोनवणे ही एमजीएम संस्कार विद्यालय बजाजनगर एमआयडीसी वाळूज या शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. कामगारांच्या मुलांना कठीण परिस्थितीत मेहनत करून पदक जिंकता येते हे तिने दाखवून दिले. याच शाळेतील इयत्ता दहावीतील त्रिवेणी काळे हिने सुद्धा या राज्य ज्यूदो स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.
शालेय राज्य ज्यूदो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सांची सोनवणे हिचे कौतुक करण्यात येत आहे. बजाजनगर क्रीडा मंडळाच्या वतीने विजयी खेळाडू सांची सोनवणे व वडील आकाश सोनवणे आणि आई मनीषा सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. सांचीला मुख्य प्रशिक्षक भीमराज रहाणे, अशोक जंगमे, सुधीर काटकर, सुप्रिया जंगमे, ऋतुजा सौदागर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
विजेत्या खेळाडूंचे बजाजनगर क्रीडा मंडळाचे नंदमूरी श्रीनिवास, मनोहर देवानी, भीमराज रहाणे, अशोक जंगमे, अनिल पवार, नामदेव दौड, अभिजीत दळवी, सुधीर काटकर, सागर घुगे , हर्षल महाजन, उषा अंभोरे, ऋतुजा सौदागर, सायली राऊत, सुप्रिया जंगमे, मुख्याध्यापक सचिन मैद आणि सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


