दोन स्पर्धांमध्ये पटकावली १६ पदके
ठाणे ः ठाणे जिल्हा सब-ज्युनियर ओपन बॅडमिंटन स्पर्धा आणि बॉम्बे जिमखाना राज्यस्तरीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंचा दमदार कामगिरी नोंदवत एकूण १६ पदकांची कमाई केली आहे.
ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी अलीकडे झालेल्या दोन महत्वपूर्ण स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ठाण्याचा झेंडा उंचावला आहे. कल्याण येथे ८ ते ९ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या ठाणे जिल्हा सब-ज्युनियर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ठाणेच्या खेळाडूंनी एकूण १४ पदके मिळवली, तर मुंबई येथे झालेल्या बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत दोन खेळाडू जोड्यांनी रौप्य पदकं पटकावत ठाण्याचा गौरव वाढवला.
कल्याण येथे झालेल्या सब-ज्युनियर स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी सर्वच एकेरी गटांमध्ये दमदार कामगिरी केली. मुलींच्या एकेरी ११ वर्षांखालील गटात शनाया तवाटे हिने सुवर्णपदक जिंकले, तर खनक कर्डे आणि अद्विका मोरे यांनी कांस्यपदक पटकावले. शनाया हिने उपांत्य फेरीत खनकचा १५-७, १५-८ असा पराभव केला आणि अंतिम सामन्यात श्रेष्टा दबरालवर १५-४, १५-५ अशी एकतर्फी मात करत विजेतेपद मिळवले. मुलांच्या एकेरी ११ वर्षाखालील गटात समर ठक्कर याने रौप्य पदक मिळवले.
मुलींच्या एकेरी १३ वर्षाखालील गटात शनाया तवाटे हिने रौप्य पदक जिंकले, तर प्रांजल पाटील आणि अद्विका मोरे यांनी कांस्यपदक पटकावले. मुलांच्या एकेरी १५ वर्षाखालील गटात तिर्थेश शाह आणि आदित्य बोनदरवाड यांनी कांस्यपदक मिळवले. मुलींच्या एकेरी १७ वर्षाखालील गटात अन्वी मोरे हिने रौप्य पदक जिंकले. मुलांच्या एकेरी १७ वर्षाखालील गटात चंद्रांशु गुंडले याने तिर्थेश शाहचा १५-९, १५-१२ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आणि अंतिम सामन्यात आदित्य बोनदरवाडवर १५-११, १५-१३ अशी मात करत सुवर्णपदक जिंकले. ही सर्व पदक विजेती मंडळी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची असून, अकॅडमीतील उत्कृष्ट प्रशिक्षण आणि शिस्तीचा हा आणखी एक पुरावा ठरला आहे.
मुंबई येथे झालेल्या बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंनी दोन रौप्य पदकं जिंकत उल्लेखनीय कामगिरी केली. १७ वर्षाखालील मिश्र दुहेरी गटात जळगावहून ठाण्यात स्थलांतरित झालेले वैभव परदेशी आणि पुर्वा पाटील या जोडीने आपल्या पहिल्याच राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या दुहेरी गटात आर्यन नायर यानेही उत्कृष्ट खेळ करत रौप्य पदक मिळवले. या दोन्ही जोड्यांनी राज्यातील कठीण प्रतिस्पर्ध्यांना तगडी लढत देत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
ही सर्व खेळाडू ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडासंकुलातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये चालविण्यात येणाऱ्या सय्यद मोदी प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत आहेत. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी सांगितले की, “खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे ठाणे बॅडमिंटन अकॅडमी राज्यभरात चमकते आहे. नव्या पिढीतील खेळाडूंची ही कामगिरी भविष्यात राष्ट्रीय स्तरावर नक्कीच गाजेल.” ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे यांनीही या सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


