राज्य स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक
धुळे : रत्नागिरी (चिपळूण-डेरवण) येथे नुकत्याच झाल्या शालेय राज्यस्तरीय अॅथलेटिक्स मैदानी स्पर्धेत धुळेचा अभिमान ठरलेली रॉयल फिटनेस क्लबची धावपटू संतोषी पिंपळासे हिने उत्कृष्ट कामगिरी करत चमकदार यश संपादन केले.
१७ वर्ष वयोगटातील मुलींच्या ८०० मीटर धावण्यात तिने अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्या जोडीला ४०० मीटर स्पर्धेत तिने तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदकाची देखील कमाई केली.
संतोषी ही धुळे जिल्हा अॅथलेटिक्स प्रशिक्षण केंद्र तसेच धुळे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन आणि रॉयल फिटनेस क्लबमध्ये प्रशिक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करते. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिस्तीच्या जोरावर तिने राज्य पातळीवर दमदार उपस्थिती दाखवत भवितव्यातील होनहार धावपटू म्हणून ठसा उमटवला आहे. ती कमलाबाई अजमेरा हायस्कूल, धुळे येथे इयत्ता १०वीमध्ये शिक्षण घेत असून शिक्षण आणि क्रीडा दोन्ही क्षेत्रांत संतुलन राखण्याचा आदर्श तिने ठेवला आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेतील या उत्कृष्ट कामगिरीमुळे संतोषीची लखनऊ येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली असून तिच्यावर संपूर्ण जिल्ह्याच्या अपेक्षा केंद्रित झाल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावरही ती असेच यश मिळवेल, असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांसह क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.
संतोषीच्या यशाबद्दल धुळे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, क्रीडा अधिकारी एम के पाटील, सचिव प्रा नरेंद्र पाटील, कोषाध्यक्ष व क्रीडाशिक्षक हेमंत भदाणे, तसेच विश्वास पाटील, सुखदेव महाले, धनंजय सोनवणे, अनिल मराठे, महेश भवरे आणि महेश मराठे यांनी तिचे अभिनंदन केले. पुढील राष्ट्रीय स्पर्धेत आणखी मोठे यश मिळवावे, अशा शुभेच्छाही तिला दिल्या.
धुळे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या संतोषीच्या या यशामुळे स्थानिक क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, युवा खेळाडूंना प्रेरणा देणारे हे यश ठरत आहे.


