राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात आयोजित १९ वर्षे गटातील महाराष्ट्र राज्य आंतर-विभागीय खो-खो स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे. १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई, पुणे, लातूर, अमरावती, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक अशा आठ विभागांतील मुले व मुलींच्या विजेत्या संघांचा या स्पर्धेत समावेश आहे. संघांना “अ” आणि “ब” या दोन गटांमध्ये विभागण्यात आले असून गट साखळी सामन्यानंतर उपांत्य फेरीतील चार संघ निश्चित झाले आहेत.

मुलांच्या गटात पुणे, लातूर, मुंबई आणि कोल्हापूर या संघांनी संघर्षपूर्ण कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. दरम्यान, मुलींच्या गटात कोल्हापूर, मुंबई, लातूर आणि यजमान नाशिक हे संघ उपांत्य फेरीत दाखल झाले. मुलींच्या “ब” गटातील कोल्हापूर–नाशिक सामन्यात पहिल्या सत्रात ५-५ अशी बरोबरी झाली होती. मात्र शेवटच्या दीड मिनिटांत कोल्हापूरने दोन गुण मिळवून सामना जिंकत गटावर वर्चस्व मिळवले.
आता उपांत्य फेरीत मुलांच्या गटात पुणे–कोल्हापूर आणि लातूर–मुंबई तर मुलींच्या गटात कोल्हापूर–लातूर आणि मुंबई–नाशिक असे रोमांचक सामने रंगणार आहेत.
या स्पर्धेचे आयोजन उपसंचालक स्नेहल साळुंके, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, तसेच नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची टीम, नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन, सुरेखाताई भोसले प्रबोधिनीचे मंदार देशमुख, उमेश आटवणे आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पंच मंडळ यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. स्पर्धेनंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची महाराष्ट्र संघासाठी निवड करण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले.
आजचे महत्त्वाचे निकाल
मुलांचा गट ः पुणे विजयी विरुद्ध मुंबई (१ गुण आणि १.४० मिनिटे राखून), नाशिक विजयी विरुद्ध नागपूर (१ डाव आणि ५ गुणांनी), लातूर विजयी विरुद्ध कोल्हापूर (५ गुणांनी), कोल्हापूर विजयी विरुद्ध अमरावती (१ डाव आणि ८ गुणांनी).
मुलींचा गट : मुंबई विजयी विरुद्ध लातूर (१ गुण आणि ३० सेकंद राखून), कोल्हापूर विजयी विरुद्ध नाशिक (२ गुणांनी), पुणे विजयी विरुद्ध नागपूर (१ डाव आणि ६ गुणांनी).


