मलकापूर ः विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर यांच्या वतीने विदर्भातील ग्रामीण व शहरी भागातील प्रतिभावंत क्रिकेटपटूंचा शोध घेण्यासाठी १५ वर्षांखालील शालेय खेळाडूंसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ही निवड चाचणी २३ नोव्हेंबर, रविवार रोजी सकाळी ९.३० वाजता मलकापूर येथील तालुका क्रीडा संकूलमध्ये पार पडणार आहे.
या निवड चाचणीसाठी १ सप्टेंबर २०१० ते ३१ ऑगस्ट २०१३ या कालावधीत जन्मलेले खेळाडू पात्र राहतील. विशेष म्हणजे, या निवड चाचणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क अथवा फी आकारण्यात येणार नाही, अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.
निवड प्रक्रियेसाठी विदर्भ क्रिकेट संघटना, नागपूर येथील निवड समितीचे सदस्य प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. सर्व खेळाडूंनी पांढरा पोशाख, क्रिकेट साहित्य, मूळ जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड व शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
खेळाडूंनी निवड चाचणीसाठी समन्वयक चंद्रकांत साळुंके तसेच संबंधित तालुका प्रतिनिधी व क्रीडा शिक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन व्हीसीए जिल्हा समितीचे अध्यक्ष नितेश उपाध्याय व बुलढाणा जिल्हा संयोजक किशोर वाकोडे यांनी केले आहे.



