छत्रपती संभाजीनगर ः शिर्डी येथे झालेल्या १२ ते १४ वयोगटातील महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी सादर करत राज्यपातळीवर आपला दबदबा निर्माण केला.
श्रीयोग शेळके याला ६१ किलो खालील वजन गटात पुण्याविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी त्याने अहिल्यानगर, वर्धा आणि मुंबई या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत रौप्य पदक पटकावले. लावण्या बेडसे हिने ४८ किलो खालील वजन गटात गोंदिया, नागपूर आणि रत्नागिरीच्या खेळाडूंना पराभूत करून कांस्य पदक मिळवले. राशी चौधरी हिने ५५ किलो खालील वजन गटात अमरावती, नागपूर आणि रत्नागिरीच्या प्रतिस्पर्ध्यांना हरवत प्रभावी कामगिरी करत कांस्य पदक पटकावले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघात मुलींमध्ये धनश्री घुगे, आराध्या जाधव, अन्वी पटेल, अमृता पवार, श्रावणी सोमवंशी, लावण्या बेडसे, रोहिणी सहानी, अनया महाजन, राशी चौधरी, आकांक्षा नागरगोजे यांनी तर मुलांमध्ये विवेक जाधव, आदित्य वनारसे, देवेश राऊत, अखिलेश आवटे, सुभाषिश बेहरा आणि श्रीयोग शेळके यांनी प्रतिनिधित्व करून दमदार खेळी केली.

या स्पर्धेत शरद पवार यांनी पंच म्हणून काम पाहिले. संघाचे प्रशिक्षक म्हणून अंतरा हिरे, कोमल आगलावे व सागर वाघ, तर रितेश गायकवाड यांनी संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी निभावली. विजेत्या खेळाडूंचे मुख्य प्रशिक्षक व राज्य संघटनेचे उपाध्यक्ष नीरज बोरसे, तसेच पदाधिकारी लता कलवार, अमोल थोरात, चंद्रशेखर जेऊरकर, राजू जाधव, संतोष सोनवणे, शरद तिवारी, अविनाश नलावडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


