मुंबई ः चेंबूर टिळक नगर येथे शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी यांची योगासन स्पर्धा उत्साहात पार पडली. राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद, महाराष्ट्र राज्य आणि यूआरसी–८ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा टिळक नगर शाळेत आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत १८ ते ४७ आणि ४८ ते ५८ अशा दोन वयोगटात महिला व पुरुष स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले. महिला गटात रोहिणी मेहेत्रे आणि शोभा शिंदे यांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवत प्रथम क्रमांक पटकावला. पुरुष गटात मोहम्मद एजाज मोमीन व अनिल राजगुरू यांनी प्रभावी योगासने सादर करून आपल्या गटात विजेतेपद मिळवले.
स्पर्धेचे पंच म्हणून महेश कुंभार, मेघना मिसाळ आणि प्रमिला नागरे यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक रुखमाजी पांढरे आणि रामचंद्र पिंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक केशव बोरकर, स्मिता पोतदार, संदेश जुईकर आणि सुवर्णा खुडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
स्पर्धेचे निवेदन डॉ जितेंद्र लिंबकर यांनी प्रभावीपणे पार पाडले. नियमित योगाभ्यासाने शारीरिक व मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत होते, हा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला.


