पुणे ः क्रीडा महर्षी हरिभाऊ साने यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कला–क्रीडा व जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ पत्रकार भवन, नवी पेठ येथे रविवारी उत्साहात पार पडला. अध्यक्ष बाळ साने यांनी हरिभाऊ साने यांच्या स्वदेशी खेळांच्या जपणुकीसाठी केलेल्या कार्याची नवीन पिढीला ओळख व्हावी म्हणून हे पुरस्कार सुरू केल्याचे प्रास्ताविकात सांगितले.
समारंभाचे प्रमुख पाहुणे साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी आणि पुण्यभूषण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई यांनी विजेत्यांचा गौरव केला. क्रीडा–अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू शकुंतलाताई खटावकर, कला–व्हायोलिन वादक पं अतुलकुमार उपाध्ये आणि माहिती अधिकार तज्ञ विजय कुंभार यांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचे कार्यवाह सुनील नेवरेकर यांनी सर्वांचे स्वागत केले.
पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील अनुभव शेअर करत समाजाचे कौतुकच पुढील कार्याची ऊर्जा देत असल्याची भावना व्यक्त केली. प्रमुख पाहुणे मिलिंद जोशी यांनी व्यायाम व खेळाचे महत्व अधोरेखित केले, तर अध्यक्षीय भाषणात डॉ देसाई यांनी प्रतिष्ठानच्या १७ वर्षांच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गिरीश पोटफोडे यांनी केले.


