नाशिक व लातूर संघांना उपविजेते; उत्कृष्ट खेळाडूंचा विशेष गौरव
नाशिक (विलास गायकवाड) ः क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलावर १९ वर्षे मुले व मुली गटातील महाराष्ट्र राज्य आंतर शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आले होते. कोल्हापूर विभागाने मुले आणि मुली अशा दोन्ही गटात उत्कृष्ट खेळ करून दुहेरी विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात नाशिक उपविजेता तर मुलांमध्ये लातूर उपविजेता ठरला.

मुलींच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरने सुरुवातीपासून आक्रमक खेळ कायम ठेवला. सलोनी जामदारने बचाव व आक्रमणात अष्टपैलू कामगिरी करत दोन गडी बाद केले. अमृता पाटीलने बचावात तब्बल पाच गडी बाद करत सामन्यावर मोहोर उमटवली. नाशिककडून सुषमा चौधरी, जागृती जाधव, रोहिणी भवर यांनी उल्लेखनीय खेळ केला; तरी कोल्हापूरने विजेतेपद कायम ठेवले.
मुलांचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. पहिल्या सत्रात ८-८ तर दुसऱ्या सत्रात १६-१६ अशी बरोबरी असताना अखेरच्या क्षणी कोल्हापूरने एका गुणाने (१७-१६) विजय मिळवला. कोल्हापूरच्या शरद घाडगे, उदय पडळकर व राजू पाटील यांनी बचावात व आक्रमणात अष्टपैलू कामगिरी केली. लातूरच्या अजय वाल्हेकर, विशाल वसावे, किरण ढाकणे यांचा खेळ देखील तोलामोलाचा होता.
विजेत्या संघांना क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंके, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे, खो-खो संघटक मंदार देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते चषक, पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनने विशेष उपक्रम राबवत विजेते संघ व उत्कृष्ट खेळाडूंना रोख पारितोषिके दिल्याचे साळुंके यांनी कौतुक केले.
या शानदार कामगिरीच्या आधारे महाराष्ट्र संघाची निवड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच, तांत्रिक समिती आणि संपूर्ण संयोजन समितीने परिश्रम घेतले.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
मुली ः सुषमा चौधरी (आक्रमक), सानिका चाफे (संरक्षक), अमृता पाटील (अष्टपैलू).
मुले ः राजू पाटील, जितेंद्र वसावे व शरद घाडगे.


