संभाजीनगरच्या तन्मय औराडेची ऐतिहासिक कामगिरी 

  • By admin
  • November 17, 2025
  • 0
  • 222 Views
Spread the love

अवघ्या २४ धावांत टिपले १० विकेट, सेंट्रल झोन टीमचा डाव गडगडला

छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमसीए अंडर १४ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाच्या तन्मय औराडे याने अवघ्या २४ धावांत दहा विकेट घेऊन यंदाच्या क्रिकेट हंगामातील एक नवा विक्रम नोंदवला आहे. तन्मयने ९.५ षटके गोलंदाजी करत चार षटके निर्धाव टाकली आणि केवळ २४ धावांच्या मोबद्लयात १० विकेट घेतल्या. तन्मयच्या प्रभावी कामगिरीमुळे छत्रपती संभाजीनगर संघाने सेंट्रल झोन संघाविरुद्ध आपले वर्चस्व राखले आहे.

पुणे येथे सेंट्रल झोन आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यात लीग सामना होत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सेंट्रल झोन संघाने ३०.५ षटकात सर्बाद ८९ धावसंख्या उभारली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावात ३७.४ षटकात सर्वबाद १७० अशी धावसंख्या उभारुन पहिल्या डावात ८१ धावांची आघाडी घेतली आहे.

गोलंदाजांचे प्रभुत्व असलेल्या या सामन्यात पहिल्या डावात सेंट्रल झोन संघाकडून सलामीवीर अथर्व राजेश याने सर्वाधिक ३५ धावा काढल्या. त्यानंतर आदर्शराजे घोलप (२५), सतीश तमनार (१०), राजकुमार ससाणे (९) यांनी आपले योगदान दिले. पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. 

छत्रपती संभाजीनगर संघाकडून सात गोलंदाजांचा उपयोग करण्यात आला.  मात्र, डावखुरा फिरकी गोलंदाज तन्मय औराडे याने आपला प्रभाव दाखवला. तन्मय याने ९.५ षटकात २४ धावांच्या मोबदल्यात १० विकेट घेऊन सामना संस्मरणीय बनवला. त्याची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. या वयोगटात छत्रपती संभाजीनगर संघाकडून अशी कामगिरी करणारा तन्मय हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

सेंट्रल झोन संघाला ८९ धावांवर रोखल्यानंतर छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावात सर्वबाद १७० धावा काढत ८१ धावांची आघाडी घेतली.

सलामीवीर सोहम गिरी याने सर्वाधिक ४३ धावा काढल्या आहेत. त्याने ३४ चेंडूंचा सामना करत सात चौकार मारले. स्वरित दरक (१६), दानिश शेख (१४), वरद सुलतान  (२४), साई गुंड (११), तन्मय औराडे (१६), विराज कानडे (२१), अब्दुल हादी मोतीवाला (१३) यांनी सुरेख फलंदाजी करत डावाला आकार दिला.

सेंट्रल झोन संघाकडून हर्ष पाटील याने ३८ धावांत पाच विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. अथर्व राजेश याने २८ धावांत चार गडी बाद करत आपली चमक दाखवली. पियुष चव्हाण याने १४ धावांत एक बळी घेतला. 

सेंट्रल झोन तीन बाद ५१
दुसऱया डावात सेंट्रल झोन संघाने २७ षटकात तीन बाद ५१ धावा काढल्या आहेत. सद्यस्थितीत छत्रपती संभाजीनगर संघ ३० धावांनी आघाडीवर आहे. अथर्व राजेश याने २८ धावा काढल्या. आदर्शराजे घोलप ५ तर आर्य १ हे स्वस्तात बाद झाले. तन्मय औराडे याने १० धावांत दोन विकेट घेऊन संघाचा दबदबा कायम ठेवला आहे. सोहम गिरी याने ११ धावांत एक बळी टिपला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव आणि एमसीए अपेक्स परिषदेचे चेअरमन सचिन मुळे यांनी तन्मय औराडे याच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *