विभागीय क्रिकेट स्पर्धेत श्री राजेंद्र हायस्कूल संघाला विजेतेपद

  • By admin
  • November 17, 2025
  • 0
  • 61 Views
Spread the love

नागपूर ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या वतीने आयोजित १७ वर्षे विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत श्री राजेंद्र हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय नागपूरने प्रभावी खेळ करत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नागपूरचा १२ धावांनी पराभव करून राज्यस्तर स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय श्री राजेंद्र विद्यालयाच्या संघाने घेतला. ५ षटकांच्या मर्यादित सामन्यात त्यांनी ५ गडी गमावून ५३ धावा उभारल्या. कुवर बावनकरने १३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर आर्यन बैसने आक्रमक फलंदाजी करत ३० धावांचे योगदान देत संघाचा डाव उभा केला. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या गोलंदाजांनी प्रयत्न केले, मात्र राजेंद्र विद्यालयाने आवश्यक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले.

प्रत्युत्तरात पोद्दार स्कूलनेही चांगला प्रयत्न करत ५ षटकांत ३ गडी बाद ४२ धावा केल्या. सामन्यातील तणावपूर्ण क्षणी श्री राजेंद्र विद्यालयाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्धी संघाला रोखून धरले. परिणामी, श्री राजेंद्र हायस्कूलचा संघ १२ धावांनी विजयी ठरला आणि राज्यस्तर स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

या उल्लेखनीय विजयाबद्दल संस्थेचे सचिव मोहन नाहतकर, सहसचिव विवेक नाहतकर, मुख्याध्यापिका डॉ स्मिता नाहतकर, उपमुख्याध्यापिका डॉ अर्चना बोडखे, पर्यवेक्षक वर्षा निवांत व विलास जाधव, प्रशिक्षक तुषार नाहतकर व सुभाष ठवकर तसेच क्रीडा शिक्षक नीरज मोरसकर, राजेश्री लामखाडे, प्रफुल्ल शेटे, मिलिंद मेश्राम व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. पुढील राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तम यश मिळावे म्हणून सर्वांनी संघास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *