छत्रपती संभाजीनगर ः एमजीएम शिक्षण संस्थेच्या नेमबाजांनी राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेसाठी निवड होऊन आपल्या कौशल्याची झलक दाखवली आहे.
अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या ३६व्या जी व्ही मावळणकर शूटिंग स्पर्धेत एमजीएम शूटिंग रेंजच्या नेमबाजांनी हे यश मिळवले आहे. या स्पर्धेत एमजीएम शूटिंग रेंजचे १३ खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी ८ खेळाडूंची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी देवेंद्र खरमाटे, कृष्णकांत पावडे, साई ताठे, प्रणव बायस, यश सदाशिवे, आर्या महाजन, निवेदिता वाघ आणि प्रमोद जाधव या नेमबाजांचा समावेश आहे. निवड झालेले हे नेमबाज खेळाडू आंतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदा निठवे यांच्या मार्गदर्शनाखाली एमजीएम शूटिंग रेंज येथे नियमित सराव करत आहेत.
डिसेंबर महिन्यात दिल्ली येथे पिस्तूल तसेच ६४ वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा होणार आहे. एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम आणि क्रीडा संचालक नितीन घोरपडे यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. एमजीएमच्या शूटरांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की गुणवत्ता, योग्य प्रशिक्षण आणि चिकाटी असेल तर यश निश्चित!


