पणजी ः मुंबईतील क्रिएटिव्ह नाईट चेस अकॅडमीचे बुद्धिबळ खेळाडू आणि प्रशिक्षक अभिषेक देशपांडे यांनी आपल्या अकॅडमीतील नवीन व अनुभवी खेळाडूंना घेऊन गोवा येथे होत असलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेला विशेष सहलीवर आणले आहे. खेळाडूंना प्रत्यक्ष जागतिक दर्जाच्या बुद्धिबळपटूंना पाहता यावे, त्यांच्या डावपेचांचे निरीक्षण करता यावे आणि खेळाची उंची प्रत्यक्ष अनुभवता यावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

अभिषेक देशपांडे हे उत्कृष्ट बुद्धिबळपटू असण्याबरोबरच एक कुशल चित्रकार असून त्यांनी ऍनिमेशनमध्ये उच्च पदवी प्राप्त केली आहे. स्पर्धेचा आनंद घेत असताना ते जागतिक दर्जाच्या अनेक बुद्धिबळपटूंची रेखाटने तयार करून विद्यार्थ्यांना दाखवत आहेत. त्यांच्या या चित्रांमुळे युवा खेळाडूंमध्ये प्रेरणा तर मिळतेच, शिवाय बुद्धिबळ खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी हातभार लागतो.
या उपक्रमात अभिषेक देशपांडे यांच्यासोबत त्यांचा मुलगा, बाल बुद्धिबळपटू अन्वय देशपांडे यांनीही काही आकर्षक चित्रे रेखाटली आहेत.


