
सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील अखेरचा पाचवा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होणार आहे. या कसोटीत कर्णधार रोहित शर्मा हा खेळणार आहे की नाही या प्रश्नावर संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी कोणताही पुष्टी केली नाही. यावरून भारतीय संघात सर्व काही ठीक नाही याची चर्चा होऊ लागली आहे. तसेच कसोटीपूर्वी होणाऱ्या पत्रकार परिषदेला रोहित शर्मा उपस्थित राहिला नाही.
शेवटचा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. रोहितचा फॉर्म चिंतेचा विषय आहे आणि तो धावा काढण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे भारतीय कर्णधाराच्या कसोटी भवितव्याबद्दल अटकळ निर्माण झाली आहेत. सिडनी कसोटी रोहित शर्माची अखेरची कसोटी असू शकते याविषयी देखील चर्चा होत आहे.
सिडनी कसोटीपूर्वी गंभीरने पत्रकार परिषद घेतली. यात गंभीरला रोहितच्या प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्याबाबत विचारले असता, गंभीरने कोणतेही उत्तर दिले नाही आणि हा प्रश्न टाळला. रोहित मात्र आपल्या सहकाऱ्यांसोबत सराव आणि फुटबॉल खेळताना दिसला. रोहितला विचारले असता गंभीर म्हणाला की, प्लेइंग ११ अजून ठरलेली नाही आणि खेळपट्टी पाहूनच निर्णय घेतला जाईल.’
पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकार गौतम गंभीरला प्रश्न विचारला गेला की कर्णधार स्वतः पत्रकारांशी का बोलला नाही? पाठीच्या समस्येमुळे वेगवान गोलंदाज आकाश दीप पाचव्या कसोटीत सहभागी होणार नाही याची पुष्टी गंभीरने केली असली तरी, गंभीरने रोहितबाबत मौन बाळगले. गंभीर म्हणाला की, रोहितसोबत सर्व काही ठीक आहे. कर्णधाराने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेला उपस्थित राहणे ही परंपरा आहे, असे मला वाटत नाही. मुख्य प्रशिक्षक तुमच्या समोर आहे आणि ते बरोबर आहे. मी शुक्रवारी सकाळी खेळपट्टी पाहीन आणि प्लेइंग ११ फायनल करेन.’
रोहितला विचारले असता तो भारतीय संघाच्या रणनीतीचा भाग आहे का? यावर गंभीर म्हणाला, मी म्हटल्याप्रमाणे खेळपट्टी पाहून प्लेइंग ११ बाबत निर्णय घेऊ. कितीही वेळा विचारले तरी माझे उत्तर एकच असेल.
रोहितवर जोरदार टीका
चौथ्या कसोटीनंतर कर्णधार रोहित शर्मावर खूप टीका झाली. कारण रोहितने गिलला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवले होते. जर भारताला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कायम ठेवायची असेल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत राहायचे असेल, तर संघाच्या हितासाठी काही पर्यायांपैकी सर्वोत्तम पर्याय निवडावा लागेल. रोहितच्या सततच्या अपयशानंतर काही माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांनी त्याच्या कसोटी क्रिकेटमधील भविष्यावर प्रश्न उपस्थित केले होते. सिडनी कसोटीनंतर रोहित रेड बॉलच्या फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा करेल, असेही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकारी आणि निवडकर्त्यांनी या निर्णयाबाबत आधीच चर्चा केल्याचीही चर्चा आहे.