सिडनी : कर्णधार रोहित शर्माला सिडनी कसोटीतून वगळण्याचा धाडसी निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतले. मालिकेच्या मध्यभागी कसोटीतून वगळलेला रोहित हा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. यापूर्वी मिसबाह उल हक, दिनेश चंडिमल, माइक डेनिस या कर्णधारांना देखील असा कटू अनुभव घ्यावा लागलेला आहे.

सिडनी क्रिकेट मैदानावर शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. कसोटीत नियमित कर्णधार रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला तर आकाश दीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे. स्थायी कर्णधार जसप्रीत बुमराहने सांगितले की, रोहितने या सामन्यासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याने एक उदाहरण ठेवले आहे.
रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीत एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. द्विपक्षीय मालिकेच्या मध्यभागी प्लेइंग ११ मधून वगळलेला रोहित भारताचा पहिला कर्णधार आहे. यापूर्वी कधीही कोणत्याही मालिकेच्या मध्यभागी भारतीय कर्णधाराला संघातून वगळण्यात आलेले नाही. मात्र, एकूणच जगभरातील क्रिकेटमध्ये असे एकूण चार वेळा घडले आहे. रोहितपूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक, श्रीलंकेचा माजी कर्णधार दिनेश चंडिमल आणि इंग्लंडचा माजी कर्णधार माइक डेनेस यांना प्लेइंग ११ मधून वगळण्यात आले होते. सर्वात पहिली घटना १९७४ च्या अॅशेसमध्ये घडली, जेव्हा डेनेसने मालिकेतील चौथ्या कसोटीतून स्वतःला वगळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी जॉन एडरिचने कर्णधारपद भूषवले. मात्र, यानंतर डेनेसने ॲडलेड कसोटीत पुनरागमन केले आणि पहिल्या डावात अर्धशतक झळकावले. त्यानंतर मेलबर्नमधील मालिकेतील सहाव्या कसोटीत त्याने १८१ धावांची खेळी केली आणि इंग्लंडने एका डावाने विजय मिळवला.
त्याच वेळी, २०१४ मध्ये असे दोनदा घडले. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान मिसबाह याने तिसऱ्या सामन्यात स्वतःला वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याच्या जागी शाहिद आफ्रिदीने नेतृत्व केले. त्याच वर्षी म्हणजे २०१४ च्या टी २० विश्वचषकादरम्यान श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार दिनेश चंडिमलने शेवटच्या तीन सामन्यांसाठी स्वतःला वगळले आणि त्याच्या जागी लसिथ मलिंगाने संघाचे नेतृत्व केले. त्याचा परिणाम असा झाला की मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ चॅम्पियन झाला. तथापि, १९७४ नंतर म्हणजेच ५१ वर्षांनंतर पहिल्यांदाच कसोटीत असे घडले आहे.
सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वैयक्तिक कारणांमुळे पर्थमधील पहिल्या कसोटीतून बाहेर राहिल्यानंतर रोहितने ॲडलेडमधील दुसऱ्या कसोटीत पुनरागमन केले. मात्र, संपूर्ण दौऱ्यात त्याची बॅट शांत राहिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतील दुसऱ्या कसोटीतून पुनरागमन केल्यानंतर त्याला तीन सामन्यांच्या पाच डावांत केवळ ३१ धावा करता आल्या आहेत. या मालिकेत त्याने ९, ३, १०, ६ आणि ३ धावांची इनिंग खेळली आहे. याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेत त्याला तीन कसोटीत केवळ ९३ धावा करता आल्या होत्या. भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ३-० असा पराभूत झाला होता. याशिवाय कर्णधारपदावरही हिटमॅन छाप पाडू शकला नाही. मेलबर्न कसोटीत त्याने शुभमन गिलला प्लेइंग ११ मधून वगळले आणि यशस्वी जैस्वालसोबत सलामीला आला, तर केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यानंतर रोहितवरही टीका झाली. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये गिल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर तिन्ही कसोटी आणि ऑस्ट्रेलियातील दोन कसोटी गमावल्या आहेत. म्हणजेच रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या सहा कसोटीत पाच कसोटी गमावल्या होत्या. एक कसोटी अनिर्णित राहिली. रोहितला गेल्या १५ कसोटी डावांमध्ये १६४ धावा करता आल्या आहेत. त्यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे.
रोहितने यावर्षी १४ कसोटी सामन्यांच्या २६ डावांमध्ये २४.७६ च्या सरासरीने ६१९ धावा केल्या. या काळात त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली. रोहितने आधीच टी २० मधून निवृत्ती घेतली आहे, पण आता त्याच्या कसोटीत सातत्य राखण्यावर सस्पेंस आहे. पठाणने समालोचन करताना सांगितले की, आता रोहित या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार नाही आणि तो निवृत्त होऊ शकतो. सिडनी कसोटीनंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर दिले जाईल.