
भले मोठे युद्ध गाजवण्याची क्षमता असणाऱ्या तलवारीचे पाते निष्क्रिय झाले की तिला अडगळीत ठेवले जाते. धाडसी पराक्रम केल्यानंतरही कमकुवत झालेल्या सेनापतीलाही दोन पावले मागे सारुन राजमालाचा कोपरा पकडावा लागतो हा आजवरचा इतिहास आहे. असेच काहीच दुर्दैव भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नशिबी आले आहे. संयमी आणि कुशल नेतृत्वातून त्याने धोनी पाठोपाठ भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
दर्जेदार कामगिरी आणि प्रकल्प बुद्धिमत्ता आणि कुशल नेतृत्वातून त्याने भारतीय क्रिकेटमध्ये नवी क्रांती घडवली आहे. त्यामुळेच इथवरचा त्याचा हा प्रवास अनेक युवा खेळाडूंसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरणार आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून सुमार कामगिरीचे शुक्लकास्ट त्याच्या पाठीमागे लागले आहे. त्यामुळेच त्याच्यावर आज आपली प्रगल्भ नेतृत्वाची तलवार मॅन करण्याचा दुर्धर प्रसंग उडवला आहे. क्रिकेट मधील टेस्ट या फॉरमॅटमध्ये अनेक खेळाडूंची खऱ्या अर्थाने कसोटी लागते. याच कसोटीमध्ये सध्या रोहित शर्मा सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे अनेक टीकाकारांना सध्या आयते कोलीत मिळाले आहे. यातूनच गेल्या काही दिवसापासून कसोटी मधील फलंदाजीत अपयशी ठरलेल्या रोहित शर्माच्या सुमार कामगिरीचे सध्या टीकाकारांनी वाभाडे काढण्यास सुरुवात केली आहे एकीकडे दबक्या आवाजात होणारी टीका आणि मैदानावरील फलंदाजीतील अपयश हेच सध्या रोहितच्या प्रगतीला लागलेले मोठे ग्रहण लागल्यासारखे आहे. फलंदाजीतील अपयशामुळे निश्चितपणे किंचितसा रोहितच्या नेतृत्वावर देखील विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळेच सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. कुशल नेतृत्व निष्णात असलेला रोहित मात्र सध्या दौऱ्यावर काहीसा निर्णय घेण्यात कमकुवत ठरत आहे. यातूनच भारतीय संघाला पराभवाची धूळ चाखावी लागत आहे. दौऱ्यावरील अपयश आणि रोहित शर्माचा दर्जेदार कामगिरी घसरलेला टक्का यामुळे सध्या भारतीय संघावर अपयशाच्या नामुष्कीचे संकट ओढवले आहे.
फलंदाजीत सातत्याने येणारे अपयश लक्षात घेऊन रोहित शर्मा याने आता स्वतःहून दोन पाऊल मागे सरण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याची ही माघार सध्या अनेक चर्चेला कारणीभूत ठरत आहे. क्रिकेटच्या सर्वोच्च फॉरमॅट मधून आता रोहित निश्चितपणे आपली तलवार मॅन करत निवृत्त होण्याच्या दिशेवर असल्याची चर्चा जोरात केली जात आहे. आपले अपयश आणि सुमार कामगिरी भारतीय संघाच्या प्रगतीत अडसर ठरू नये म्हणून त्याने स्वतः विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला कसोटी संघातून वगळण्याची वल्गणा सध्या जोरात केली जात आहे. सिडनी कसोटीच्या अंतिम ११ खेळाडूंच्या संघातून त्याला वगळण्यात आले असे सध्या खमंग चर्चेत विश्लेषणात्मक पद्धतीने मांडले जात आहे. रोहित शर्मा अपेक्षित कामगिरी न करता आल्याने सध्या अडगळीत पडण्याच्या दिशेला आहे.
दर्जेदार कामगिरी आणि कुशल नेतृत्वातून रोहित शर्मा याने भारतीय संघात नवा बदल घडवून आणला एकूणच त्याच्या नेतृत्वातील कामगिरी ही खऱ्या अर्थाने कौतुकास्पद झालेली आहे. कुशल नेतृत्व आणि अचूक निर्णयातून त्याने भारतीय संघाची विजयी घोडदौड कायम ठेवले. त्यामुळे आयसीसीच्या स्पर्धेतील भारतीय संघाचे यश हे दैदीप्यमान ठरले आहे. याच कामगिरीमुळे त्याच्यावर जगभरातील क्रिकेट तज्ञ आणि माजी खेळाडू सातत्याने कौतुकाचा वर्षाव करताना दिसले. याशिवाय त्याचीही कामगिरी आयसीसीच्या सदस्य असलेल्या अनेक देशाच्या संघातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरली. त्याने अप्रतिम कामगिरी करत बलाढ्य मानल्या जाणाऱ्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या संघांनाही पराभवाची धूळ चारत आपली प्रगल्भ क्षमता सिद्ध केली. त्यामुळेच त्याचा हा दर्जा सातत्याने कायम राहावा अशीच साजेशी अपेक्षा क्रिकेट प्रेमींकडून केली जात आहे. मात्र कामगिरीत सातत्य ठेवले काही वेळा अवघड होते हेच दुर्दैव सध्या रोहितच्या पदरात पडले आहे. ऑस्ट्रेलिया दौरा असलेल्या भारतीय संघाकडून खेळताना या मालिकेत त्याला पाच डावात मिळून फक्त ३१ धावा करता आल्या आहेत. त्यामुळेच सध्या तो टीकेचा धनी ठरला आहे. मात्र प्रत्येक खेळाडूलाच आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवणे अवघड असते आणि याच माफक अपेक्षेला बळी ठरल्याने अनेक खेळाडूंचे करिअर बेचिराख झाल्याचे क्रिकेटच्या इतिहासात नोंद आहे. याच वाटेवर सध्या रोहित शर्मा मार्गस्थ झाल्याचे म्हटले जाते. मात्र फिनिक्स पक्षासारखे राखेतून पेटून उठण्याचे कौशल्य ही रोहित शर्मामध्ये निश्चित जाणवते. त्यामुळेच आगामी काळातील त्याच्या प्रत्येक कृतीवर सर्वांचे लक्ष असेल हे मात्र निश्चित आहे.