
मिताली भोयरला सुवर्ण, जान्हवी, कौशिक चौधरीला रौप्यपदक
नागपूर : अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप स्पर्धेत नागपूरच्या मिताली भोयरने सुवर्णपदक तर जान्हवी हिरुडकर व कौशिक चौधरी यांनी रौप्यपदक पटकावले.
एसआरपीएफ कॅम्प ग्रुप क्रमांक ९ वडाली नाका अमरावती या ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात आली. अमरावती जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेने स्पर्धेचे आयोजन केले होते. २० वर्षांखालील मुलींच्या गटात आठ किमी दौडीत ट्रॅक स्टार अॅथलेटिक्स क्लबच्या मिताली भोयर हिने सुवर्णपदक जिंकले. एसबीसिटी कॉलेजच्या अंजली मडावी हिने कांस्यपदक प्राप्त केले.
१८ वर्षांखालील मुलींच्या गटात हिंदू मुलींच्या शाळेच्या जान्हवी हिरुडकर हिने रौप्यपदक पटकावले. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात खेल फाऊंडेशनच्या कौशिक चौधरी याने रौप्यपदक जिंकले.
मुलींच्या गटात जान्हवी बावणे हिने कांस्य पदक प्राप्त केले. तसेच २० वर्षांखालील मुलींच्या गटात ३४ गुणांसह नागपूर संघाने उपविजेतेपद संपादन केले. पुरुष गटात ६२ गुणांसह नागपूर संघाने तिसरे स्थान मिळवले. महिला गटात ३६ गुणांसह दुसरा क्रमांक संपादन केला.
मिताली भोयर आणि जान्हवी बावणे या धावपटूंना रवींद्र टोंग आणि उमेश नायडु यांचे तर जान्हवी हिरुडकर हिला अश्फाक शेख यांचे, कौशिकला गजानन ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. नागपूर जिल्हा संघाचे प्रशिक्षक रामचंद्र वाणी तर संघ व्यवस्थापक कमलेश हिंगे हे होते, अशी माहिती नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी यांनी दिली.
खेळाडूंनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी यांनी आनंद व्यक्त केला. गुरुदेव नगराळे, नागेश सहारे, डॉ. संजय चौधरी, सभापती उमेश नायडू, शेखर सूर्यवंशी, डॉ. विबेकानंद सिंह, रामचंद्र वाणी, एस. जे. अन्थोनी आणि अर्चना कोट्टेवार, राजेश भूते, चंद्रभान कोलते, ब्रिजमोहन सिंग रावत, कमलेश हिंगे, आशुतोष बावणे, निशांत डेहरिया, शुभम गौरव, पंकज करपे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.