
देशभरातील ८५० खेळाडूंचा सहभाग
गोवा : युथ गेम्स कौन्सिल इंडियातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॅशनल युथ गेम्स स्पर्धेला गोवा येथे सोमवारपासून (६ जानेवारी) प्रारंभ होणार आहे.
युथ गेम्स कौन्सिल इंडियाने त्यांच्याशी संलग्न असलेल्या राज्यांमध्ये जिल्हा ते राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करुन गुणवान खेळाडूंचा शोध उपक्रम पूर्ण केला आहे. आता या नव्या प्रतिभावान खेळाडूंना नॅशनल युथ गेम्समध्ये आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती संयोजक राणा अमरसिंह यांनी दिली.
तिसरी नॅशनल युथ गेम्स स्पर्धा ६, ७, ८ जानेवारी या कालावधीत पेद्देम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मापुसा, गोवा येथे रंगणार आहे. या स्पर्धेत मुलांच्या गटात १४ आणि मुलीं गटात ११ राज्यांतील खेळाडू आपले क्रीडा कौशल्य दाखवतील असे राणा अमरसिंह यांनी सांगितले.
या स्पर्धेत देशभरातून ८५० खेळाडू सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेत सर्व सहभागी संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे.
मुलांच्या गटात महाराष्ट्राचा संघ अ गटात खेळत असून या गटात गोवा संघासह कर्नाटक, छत्तीसगढ या संघाना स्थान देण्यात आले आहे. मुलींच्या गटात महाराष्ट्र संघासह दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश हे संघ असणार आहेत.
महाराष्ट्र संघाची सलामी तेलंगणा सोबत
मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाचा सलामीचा सामना ६ जानेवारीला तेलंगणा संघाशी तर ७ जानेवारीला महाराष्ट्र संघ उत्तर प्रदेश संघाविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता जम्मू आणि काश्मीर विरुद्ध महाराष्ट्र संघ भिडेल. मुलींच्या गटात महाराष्ट्र संघ ६ जानेवारी रोजी दिल्ली आणि ७ जानेवारी रोजी कर्नाटक संघाविरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेच्या प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत धडक मारतील. उपांत्यपूर्व फेरीचे सामने ७ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता सुरू होतील. ८ जानेवारी रोजी अंतिम सामना खेळला जाईल, अशी माहिती युथ गेम्स कौन्सिल इंडियाचे संस्थापक आणि राष्ट्रीय सचिव राणा अमरसिंह यांनी दिली.