
ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी १० वर्षांनी जिंकली, जसप्रीत बुमराह मालिकावीर
सिडनी : पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाचा सहा विकेट राखून पराभव करत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलिया संघाने तब्बल १० वर्षांनी ही ट्रॉफी जिंकली आहे. तसेच भारतीय संघाने सलग दुसरी कसोटी मालिका गमावली. जसप्रीत बुमराह याला मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या मालिका पराभवासह भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
सिडनी येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने चार गडी गमावून लक्ष्य गाठले. या पराभवासह भारताने बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिका गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-१ ने जिंकली. यासोबतच भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली असून दक्षिण आफ्रिकेने आधीच पात्रता मिळवली आहे. जूनमध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात १८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांवर संपला. भारतीय संघाकडे दुसऱ्या डावात चार धावांची आघाडी होती. भारताचा दुसरा डाव १५७ धावांत आटोपला आणि एकूण आघाडी १६१ धावांची झाली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सॅम कॉन्स्टास (२२), उस्मान ख्वाजा (४१), मार्नस लॅबुशेन (६) आणि स्टीव्ह स्मिथ (४) यांचे विकेट गमावले. यानंतर ट्रॅव्हिस हेड (नाबाद ३४) आणि ब्यू वेबस्टर (नाबाद ३९) यांनी ४६ धावांची नाबाद भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाला दुसऱ्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराह शिवाय खेळावे लागले. त्याचा फटका भारतीय संघाला बसला. बुमराहला पाठीचा त्रास होत आहे. त्याच्या जागी विराट कोहलीने संघाचे नेतृत्व केले. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने तीन, तर सिराजला एक विकेट मिळाली.
भारत सर्वबाद १५७ धावा
भारताचा दुसरा डाव १५७ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली होती. राहुल १३ धावा करून बाद झाला. यशस्वीने २२ धावा केल्या. या दोघांनाही बोलंड याने बाद केले. शुभमन गिल १३ धावा करून वेबस्टारचा बळी ठरला. विराट कोहली पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला स्पर्श करण्याच्या प्रयत्नात स्लिपमध्ये झेलबाद झाला. त्याला सहा धावा करता आल्या. बोलंडने पुन्हा एकदा कोहलीची शिकार केली. पंतने ३३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६१ धावांची धाडसी खेळी केली. त्याचवेळी नितीश रेड्डी सलग तिसऱ्या डावात अपयशी ठरला. त्याला चार धावा करता आल्या. रविवारी भारताने सहा विकेट्सवर १४१ धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि १६ धावा करताना उर्वरित चार विकेट गमावल्या. रवींद्र जडेजा (१३) आणि वॉशिंग्टन सुंदर (१२) यांना कमिन्सने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर मोहम्मद सिराज (४) आणि जसप्रीत बुमराह (०) यांना स्कॉट बोलंडने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बोलंडने एकूण सहा विकेट घेतल्या. त्याचवेळी कमिन्सला तीन विकेट मिळाल्या. ब्यू वेबस्टर याला एक विकेट मिळाली.
बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेत भारताने पर्थ येथे २९५ धावांनी विजय मिळवून चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर भारतीय संघाची कामगिरी घसरली. ॲडलेडमधील डे-नाईट टेस्टमध्ये भारतीय संघाचा १० विकेट्सनी पराभव झाला. त्याचवेळी ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिली. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. मेलबर्नमधील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने १८४ धावांनी विजय मिळवला. आता सिडनी कसोटी सहा गडी राखून जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी ३-१ ने जिंकली. सिडनी कसोटीनंतर बोलंडला सामनावीर, तर जसप्रीत बुमराहला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. या मालिकेत बुमराह याने सर्वाधिक ३२ बळी घेतले. भारताने शेवटची ही मालिका २०१४-१५ मध्ये गमावली होती. त्यानंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने २-० असा विजय मिळवला होता.