-शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी आयोजन
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने ७ ते १० जानेवारी या कालावधीत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रीडा विभागाच्या वतीने कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक होऊन नियोजन करण्यात आले. विद्यापीठातील प्राध्यापक, अधिष्ठाता, संवैधानिक अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार यांच्यासाठी, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, क्रिकेट, रस्सीखेच व संगीत-खुर्ची पुरुष व महिला गटांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार असून विजयी व उपविजयी खेळाडू व संघांना मेडल्स, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक विद्यापीठ कर्मचारी वर्गांनी स्पर्धेत सहभाग घेऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप यांनी केले आहे.