
रेल्वे संघाचा ३३ धावांनी विजय, अंकित बावणेचे अर्धशतक
मुंबई : सलग सहा सामने जिंकल्यानंतर महाराष्ट्र संघाला विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सातव्या सामन्यात पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. रेल्वे संघाने महाराष्ट्र संघावर ३३ धावांनी विजय नोंदवला.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रेल्वे संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात सात बाद २८४ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचे पाठलाग करताना महाराष्ट्र संघ ४९.४ षटकात २५२ धावांवर सर्वबाद झाला.
रेल्वे संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अंश यादव ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर एस. ए. आहुजा (५५) व साहेब युवराज सिंग (७९) या जोडीने आक्रमक फलंदाजी करत डावाला आकार दिला. ही जोडी बाद झाल्यानंतर मोहम्मद सैफ (२९), उपेंद्र यादव (१७), रवी सिंग (११), आशुतोष शर्मा (४७), शुभम चौबे (नाबाद २९) यांनी संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
महाराष्ट्र संघाकडून प्रदीप दधे याने ७६ धावांत तीन विकेट घेतल्या. मुकेश चौधरी याने ५४ धावांत दोन बळी घेतले. सत्यजित बच्छाव (१-५१), सिद्धेश वीर (१-३१) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
महाराष्ट्र संघासमोर विजयासाठी २८५ धावांचे आव्हान होते. ओम भोसले (१४), सिद्धेश वीर (३४) यांनी डावाची सुरुवात आक्रमक केली. परंतु, ते दोघेही लवकर बाद झाले. रुतुराज गायकवाड १३ धावांवर तंबूत परतला. अंकित बावणे याने ९६ चेंडूत ६४ धावांची खेळी करत संघाचे सामन्यातील आव्हान कायम ठेवले. अंकितने एक षटकार व तीन चौकार मारले.
राहुल त्रिपाठी (२), अजीम काझी (३५), निखिल नाईक (४१), सत्यजीत बच्छाव (२७), रजनीश गुरबानी (१२) यांनी धावगती कायम ठेवण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यात ते बाद देखील झाले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला ३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हा महाराष्ट्र संघाचा या स्पर्धेतील पहिला पराभव आहे.
रेल्वे संघाकडून पूर्णांक त्यागी याने ५७ धावांत पाच विकेट घेत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. आर के चौधरी याने ४३ धावांत तीन गडी बाद केले. अंश यादव याने ३९ धावांत दोन बळी घेतले.