बाबर आझम आणि शान मसूदने रचला इतिहास

  • By admin
  • January 6, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

२०५ धावांची भागीदारी करून २२ वर्षे जुना विक्रम मोडला

केपटाऊन : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद आणि माजी कर्णधार बाबर आझम यांनी आश्चर्यकारक कामगिरी करत २०५ धावांची भागीदारी करून २२ वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. बाबर आणि शान मसूद यांनी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ही भागीदारी केली.

दिवसअखेर मसूद शतक झळकावून क्रीजवर राहिला, तर बाबर आझम शतक पूर्ण करण्याआधीच पॅव्हेलियनमध्ये परतला. बाबर आणि शान मसूद यांनी पहिल्या विकेटसाठी २०५ धावांची भागीदारी केली. बाबरने १० चौकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. त्याचवेळी तिसऱ्या दिवसअखेर शान मसूदने १४ चौकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या होत्या.

२२ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला
२०५ धावांची भागीदारी करून बाबर आझम आणि शान मसूद यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानसाठी सर्वात मोठी सलामी भागीदारी करण्याचा विक्रम मोडला. यापूर्वी २००३ मध्ये फैसलाबाद येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या इम्रान फरहत आणि तौफिक उमर यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३७ धावांची सलामी दिली होती.

सामन्याचे तीन डाव पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने एक बाद २१३ धावा केल्या आहेत. संघासाठी कर्णधार शान मसूद आणि खुर्रम शेहजाद क्रीजवर उपस्थित आहेत. सध्या पाकिस्तान या सामन्यात २०८ धावांनी पिछाडीवर आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद ६१५ धावा केल्या होत्या. यादरम्यान, रिकेल्टनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि २९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २५९ धावा केल्या. याशिवाय कर्णधार टेंबा बावुमा आणि वेरिन यांनी शतकी खेळी खेळली. बावुमाने ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या तर व्हेरिनने ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. यानंतर पाकिस्तान पहिल्या डावात १९४ धावांवर ऑलआऊट झाला आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांना फॉलोऑन दिला, त्यानंतर संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *