शिपनूर (घाटघर) कोकणकडावर गिरिप्रेमीची प्रस्तरारोहण मोहीम यशस्वी

  • By admin
  • January 6, 2025
  • 0
  • 119 Views
Spread the love

पुणे : गिरिप्रेमी संस्थेच्या ४३व्या स्थापना दिनानिमित्त आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला संस्थेच्या सदस्यांनी कळसूबाई पर्वतरांगेत असलेल्या घाटघर येथील ‘शिपनूर कोकणकडा’ येथे प्रस्तरारोहण मोहीम यशस्वी केली. 

याआधी आरोहण न केलेल्या या १५४१ फूट उंच कड्यावर पहिल्या-वहिल्या चढाईला चिन्हांकित करून संघाने ही आव्हानात्मक चढाई यशस्वी केली. अत्यंत अवघड दर्जाची चढाई (सेंट्रल रूट) असूनही गिर्यारोहकांनी त्यांच्या दुसऱ्या प्रयत्नात अत्यंत सावधगिरीने आणि धाडसी प्रयत्नांनी हे आव्हान पूर्ण केले. त्यामुळे ही कामगिरी आणखी उल्लेखनीय झाली.

संघाने मागील वर्षी याच चढाईसाठी प्रयत्न केला होता, परंतु वेळेअभावी तो पूर्ण होऊ शकला नव्हता. चढाई मार्गाच्या सुरुवातीला पोचण्याकरिता संघाला दोन तासांचा खडतर मार्गक्रमण करत पोहचावे लागले व त्यानंतर दीड हजार फूट उंच या अजस्त्र भिंतीवर प्रस्तरारोहणाचे साहित्य घेऊन चढाई करावी लागली. मागील वर्षीच्या अनुभवामुळे संघाने या वर्षी ही संपूर्ण मोहीम तीन दिवसात पूर्ण केली. याचसोबत घाटघर जवळीलाच आणखी एका १६० फूट उंच अशा नव्या कड्यावरही एव्हरेस्ट शिखरवीर कृष्णा ढोकले आणि गणेश मोरे यांनी यशस्वी चढाई केली.

संस्थेचा गिर्यारोहक अक्षय भोगडे याने या मोहिमेचे नेतृत्व केले. अक्षय सोबत पवन हाडोळे, समीरण कोल्हे, विवेक शिवदे, मिहीर जाधव, वरुण भागवत व कृष्णा ढोकले यांनी या कड्यावर चढाई केली. आशिष माने, गणेश मोरे, रुपेश खोपडे या संस्थेच्या वरिष्ठ गिर्यारोहकांनी मोहिमेला मोलाची साथ आणि अनुभवांची शिकवण दिली. ज्येष्ठ गिर्यारोहक आणि शिव छत्रपती पुरस्कार विजेते उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. अखिल काटकर, अभय खेडकर, जयसिंह देशमुख, कौशल गद्रे, चिंतामणी गोडबोले, अक्षय पाटील, विवेक काटकर यांचा समावेश असलेल्या बेसकॅम्प संघाने संघाला उत्कृष्ट पाठबळ दिले. अभिषेक नारिवडेकर याने मोहिमेच्या चित्रीकरण आणि छायाचित्रणात महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *