
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध टी २० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी पाठदुखीने त्रस्त असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिली जाऊ शकते. सद्यस्थितीत बुमराह या मालिकेत खेळणार नाही अशीच चर्चा होत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान बुमराहला पाठीच्या समस्येमुळे मैदान सोडावे लागले होते. आता भारतीय संघाचे लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर आहे. त्यामुळे बुमराहच्या दुखापतीचा विचार करून त्याला ब्रेक दिला जाऊ शकतो.
खरेतर बुमराहच्या पाठीत समस्या आहे. सिडनी कसोटी दरम्यान तो रुग्णालयात गेला होता. त्याचे स्कॅनिंग येथे करण्यात आले. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप बुमराहच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. बुमराहची दुखापत अधिक गंभीर असल्यास तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमधून देखील बाहेर जाऊ शकतो. मात्र सध्या भारताचे लक्ष इंग्लंड मालिकेवर आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार बुमराहला या मालिकेतून वगळले जाऊ शकते.
जर बुमराहला ग्रेड १ दुखापत झाली असेल तर त्याला बरे होण्यासाठी किमान दोन ते तीन आठवडे लागतील. ग्रेड २ ची दुखापत असल्यास, त्याला किमान सहा आठवडे लागतील. तर ग्रेड ३ च्या दुखापतीसाठी, किमान तीन महिने आवश्यक आहेत. ग्रेड १ च्या दुखापती सामान्य आहेत. यामध्ये शरीराच्या कोणत्याही भागात सौम्य वेदना, सूज किंवा किरकोळ दुखापत यांचा समावेश होतो. परंतु ग्रेड २ च्या दुखापतींमध्ये स्नायूंच्या ताणासह अनेक समस्यांचा समावेश होतो.
इंग्लंडचा भारत दौरा
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ टी २० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. २२ जानेवारीपासून टी २० मालिका सुरू होणार आहे. तर एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात, दुसरा कटक आणि तिसरा अहमदाबाद येथे खेळवला जाईल.