
बुलावायो : अफगाणिस्तान संघाने कसोटी मालिकेत झिम्बाब्वेचा १-० असा पराभव केला आहे. अफगाणिस्तानने दुसरी कसोटी ७२ धावांनी जिंकली. पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. या सामन्यात राशिद खान याने ११ विकेट घेत संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका पार पाडली.
राशिद खानने घातक गोलंदाजी करत दुसऱ्या कसोटीत एकूण ११ विकेट घेतल्या. रहमत शाह आणि इस्मत आलम यांनीही अफगाणिस्तानसाठी आपली ताकद दाखवली. या दोघांनी बुलावायो कसोटीच्या दुसऱ्या डावात शतके झळकावली.
दुसऱ्या कसोटीत झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली होती. झिम्बाब्वेने पहिल्या डावात अफगाणिस्तानला केवळ १५७ धावांवर ऑल आऊट केले होते. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा आणि न्यूमन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. यानंतर झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी दाखवली. संघाने पहिल्या डावात २४३ धावा केल्या. यादरम्यान क्रेग इर्विनने ७५ धावांची दमदार खेळी केली. तर सिकंदर रझाने ६१ धावांची भर घातली. राशिद खानने या डावात ४ विकेट घेतल्या.
अफगाणिस्तानने खेळ फिरवला
अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात खेळ बदलला. अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात सर्वबाद ३६३ धावा केल्या. यादरम्यान रहमतने १३९ धावांची खेळी केली. त्याने १४ चौकार मारले. तर इस्मतने १०१ धावा केल्या. त्याच्या खेळीत ९ चौकारांचा समावेश होता. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ दुसऱ्या डावात २०५ धावा करत सर्वबाद झाला. या डावात इर्विन याने अर्धशतक झळकावले. त्याने ५३ धावा केल्या.
राशिद खानची घातक गोलंदाजी
राशिदने या सामन्यात एकूण ११ विकेट घेतल्या. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. झिम्बाब्वेच्या पहिल्या डावात रशीदने ४ बळी घेतले. तर दुसऱ्या डावात ७ विकेट्स घेतल्या. या डावातील २७.३ षटकात त्याने ६६ धावा दिल्या.