
मयुरी थोरात, श्रद्धा गिरमे, गायत्री सुरवसेची लक्षवेधक कामगिरी
पुणे : सुरत येथे सुरू असलेल्या बीबीसीआयच्या अंडर १९ महिला क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने चंदीगड महिला संघावर २२४ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात मयुरी थोरात (नाबाद ८९), श्रद्धा गिरमे (६६) व गायत्री सुरवसे (४-१०) यांची कामगिरी लक्षवेधक ठरली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्र महिला संघाने ५० षटकात सहा बाद २८७ अशी भक्कम धावसंख्या उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. सुहानी कहांडळ व श्रद्धा गिरमे या सलामी जोडीने १०१ धावांची भागीदारी करुन संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. सुहानीने आठ चौकारांसह ४८ धावा काढल्या. श्रद्धाने ६६ धावांची बहारदार खेळी करताना दोन षटकार व सात चौकार मारले. सह्याद्री कदमने पाच चौकारांसह ३७ धावा काढल्या. शाल्मली क्षत्रीय (०), साक्षी शिंदे (७), श्रुती महाबळेश्वरकर (६) या लवकर बाद झाल्या.
मयुरी थोरात हिने अवघ्या ५८ चेंडूत नाबाद ८९ धावांची वादळी खेळी करत संघाला भक्कम धावसंख्या उभारुन दिली. मयुरीने आपल्या धमाकेदार खेळीत १५ चौकार व एक षटकार मारला. निकिता सिंग (२) नाबाद राहिली. चंदीगड महिला संघाकडून आहान (२-४३), समायरा ठाकूर (२-४६), राखी धीर (२-४४) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
चंदीगड संघासमोर विजयासाठी २८८ धावांचे मोठे लक्ष्य होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना चंदीगड संघ २१.५ षटकात अवघ्या ६३ धावांत गडगडला. जस्मित (१६), दिव्यनिधी (१४) यांनी धावांचा दुहेरी आकडा गाठला. अन्य फलंदाज झटपट बाद झाले. महाराष्ट्र संघाकडून गायत्री सुरवसे हिने प्रभावी गोलंदाजी करत १० धावांत चार विकेट घेत संघाला मोठा विजय मिळवून दिला.