
विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : खेळ आणि क्रीडा स्पर्धा शारीरिक सदृढतेसाठी आयोजित केल्या जातात. पालक आणि बालक क्रीडा स्पर्धेमुळे पालक आणि शिक्षक यांच्यात उत्कृष्ट संवाद निर्माण होण्यासाठी मदत होईल. या सुसंवादामुळे अनेक छोटे-मोठे प्रश्न शाळा पातळीवरच सुटतील. क्रीडा स्पर्धेमुळे शैक्षणिक विकासाची आंतरक्रिया घडून येईल. पालक आणि शाळा यांच्यातील दरी कमी होईल. खिलाडूवृत्ती निर्माण होईल. प्रत्येकाने आपल्या आवडत्या क्षेत्रात पदार्पण करावे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.
विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर विद्यार्थी व पालक यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विभागीय आयुक्त गावडे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामीण पोलिस अधीक्षक विनय राठोड, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, राजेंद्र देसले, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील, शिक्षणाधिकारी योजना अरुणा भूमकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
संवादाचे उत्तम माध्यम
‘खेळ हे संवादाचे उत्कृष्ट माध्यम असून आपल्यातील सुप्तगुण व्यक्त करण्याचे व्यासपीठ जिल्हा परिषदेने पालकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. याचा लाभ यावर्षी जिल्हाभरातील जवळपास ४० हजारांहून अधिक पालकांनी यात सहभाग घेऊन नोंदविला आहे. जिल्हा परिषदेच्या विविध योजना व माहिती ४० हजार पालकांपर्यंत नेण्यासाठी आम्ही यशस्वी झालो आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी यावेळी केले.
‘आयुष्यात मी पहिल्यांदाच पालक व विद्यार्थी यांच्या एकत्रित क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याचे बघतोय. यानिमित्ताने माझ्यातील बालपणीचा खेळाडू जागृत झाला आहे असे गौरवोद्गार ग्रामीण पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी काढले.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगाव शाळेच्या विद्यार्थिनी वैष्णवी शरद पवार, संस्कृती भगवान पवार यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून या स्पर्धेचा प्रारंभ पालक व विद्यार्थी खेळाडूंमध्ये चैतन्यदायी उत्साहात करण्यात आला. राजे संभाजी सैनिकी विद्यालयाच्या बँड पथकाने नेत्रदीपक पथसंचलन करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी योजना अरुणा भूमकर यांनी केले. सूत्रसंचालन सचिन वालतुरे व किरण गाडेकर यांनी केले. उपशिक्षणाधिकारी नीता श्रीश्रीमाळ यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांच्यात प्रदर्शनीय क्रिकेटचा सामना खेळविण्यात आला. या रोमहर्षक सामन्यात पत्रकार संघाने जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी क्रीडा संघावर मात केली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे, निता श्रीश्रीमाळ, गटशिक्षणाधिकारी समाधान आराख, हेमंत उशीर, दीपाली थावरे, क्रांती धसवाडीकर, श्रीराम केदार, अनिल पवार, रंगनाथ आढाव, विलास केवट, सचिन शिंदे, प्रदीप राठोड, संगीता सावळे, लईक सोफी, संगीता गायकवाड, आर. डी. फुसे, कृष्णा शिंदे, राजेश हिवाळे, प्रशांत हिवर्डे, प्रदीप जाधव, सतीश औरंगाबादकर, सदाशिव पाटील, उज्वला ठोंबरे परिश्रम घेत आहेत.
छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, कन्नड, पैठण, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, सोयगाव या नऊ तालुक्यांच्या पालक व विद्यार्थी खेळाडूंनी आपल्या खेळाचे या निमित्ताने सर्वोत्तम प्रदर्शन केले.