
ठाणे: ‘हवा म्हणजे प्राणवायू हा अन्न आणि पाण्यापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. म्हणूनच योगाभ्यास नियमित करणे अत्यावश्यक आहे. त्रैमासिक वर्ग पूर्ण केल्यानंतर साधकांनी योगाभ्यासात सातत्य राखत पुढील वर्गांतही सहभागी व्हावे,’ असा सल्ला ज्येष्ठ योगगुरू शेखर पेटकर यांनी दिला.
श्री अंबिका योग कुटीर आणि श्री आनंद भारती समाज यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या साडे तीन दशकांपासून दर रविवारी सकाळी श्री आनंद भारती समाज सभागृहात विनामूल्य त्रैमासिक योगाभ्यास वर्ग आयोजित केला जातो. या उपक्रमाचा ५८ व्या वर्गाचा समारोप आणि ५९ व्या वर्गाचा प्रारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
समारंभाचे वैशिष्ट्य
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री आनंद भारती समाजाचे अध्यक्ष हरेश्वर मोरेकर होते. यावेळी कार्याध्यक्ष ओमप्रकाश धीरोलिया, योग विभाग प्रमुख सचिन काटकर, माजी कार्याध्यक्ष महेश कोळी, आणि ज्येष्ठ सदस्य प्रल्हाद नाखवा यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कोळी यांनी केले. ५८ व्या त्रैमासिक वर्गात ३५ पुरुष आणि १५ महिला सहभागी झाल्या होत्या. या वर्गात प्रशिक्षक योगेश पाचपांडे, प्रवीण धुरी, रमेश कोळी, मीनाक्षी कोळी, मनोज पटेल, शरद पाटील आणि ऋषिकेश माळगावकर यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान
या वर्गातील यशस्वी प्रशिक्षणार्थी शिवांगी राणे, मिना कोळी, दीपाली पाटील, राजश्री सोनावणे, कांचन कोळी, मोहन चव्हाण, विजय आपटे, आणि सलील कोळी यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
योगगुरू शेखर पेटकर यांनी उपस्थित साधकांना योगाभ्यासाचा जीवनातील महत्त्व समजावत, सातत्य टिकवून ठेवण्याचे महत्त्व सांगितले. “योगाभ्यास केवळ शारीरिक स्वास्थ्यासाठी नव्हे तर मानसिक स्थिरतेसाठीही आवश्यक आहे,’ असे त्यांनी नमूद केले.