
अमरावती : दिल्ली येथे होणाऱ्या ६८व्या राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अमरावतीची खेळाडू रिया महादेव कासार ही संघाचे नेतृत्व करणार आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व महाराष्ट्र राज्य स्क्वॅश संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र स्क्वॅश अकादमी उंद्री, पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण ८ विभागाचे १९ वर्षांखालील मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये अमरावतीच्या एकूण १० खेळाडूंनी १९ वर्षांखालील मुले-मुलींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये रिया महादेव कासार हिने अंतिम फेरी गाठून पाचवा क्रमांक प्राप्त केला. या कामगिरीमुळे रियाची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.
राष्ट्रीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धा १६ ते २० जानेवारी या कालावधीत दिल्ली येथे होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण कॅम्प ११ ते १५ जानेवारीपर्यंत राहणार आहे. या कॅम्पमध्ये रिया कासार सहभागी होणार आहे. महाराष्ट्र संघामध्ये पाच मुले व मुलींचा सहभाग असेल. सदर खेळाडू हे छत्रपती स्क्वॅश अकादमीचे खेळाडू असून त्यांचा नियमित सराव गणेश तांबे व सुविध्य वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा संकुल अमरावती येथील स्क्वॅश कोर्ट या ठिकाणी होत आहे.
महाराष्ट्र स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे व सचिव डॉ दयानंद कुमार यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. रिया कासार हिची निवड झाल्याबद्दल अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, संजय पांडे, संजय कथडकर, तसेच सुशिल सुर्वे, सतीश पहाडे, प्रदीप शेटीये, संतोष विघ्ने, सदानंद जाधव, सुमित थोरात, वैभव झोंबाडे यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अमरावती शहर स्क्वॉश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष निखिल परिहार, सचिव गणेश तांबे व छत्रपती स्क्वॅश अकादमीतील सर्व खेळाडूंनी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.