
व्हेरॉक शालेय क्रिकेट स्पर्धा : व्योम खर्चे, स्वराज रणसिंग आणि प्रतीक सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : १६व्या व्हेरॉक करंडक आंतर शालेय टी २० क्रिकेट स्पर्धेत केम्ब्रिज स्कूल, देवगिरी ग्लोबल अकॅडमी आणि एसएफएस स्कूल या संघांनी दणदणीत विजयासह आपली आगेकूच कायम ठेवली. या सामन्यांमध्ये व्योम खर्चे, स्वराज रणसिंग आणि प्रतीक यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.
एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात केम्ब्रिज स्कूल संघाने राजा शिवाजी हायस्कूल संघाचा तब्बल १७६ धावांनी पराभव केला. केम्ब्रिज स्कूलने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात चार बाद २२५ असा धावांचा डोंगर उभारला. या धावसंख्येचा पाठलाग करताना राजा शिवाजी हायस्कूल संघ १५.१ षटकात अवघ्या ४९ धावांत गडगडला. केम्ब्रिज स्कूलने १७६ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात व्योम खर्चे (९०), स्पर्श पाटणी (६१), समर्थ तोतला (३०) यांनी तुफानी फलंदाजी करत मैदान गाजवले. गोलंदाजीत व्योम खर्चे याने ११ धावांत पाच विकेट घेत अष्टपैलू कामगिरी नोंदवली. ध्रुव देखणे (२-१९) व व्यंकटेश जाधव (२-३५) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात देवगिरी ग्लोबल अकॅडमीने दहा विकेट राखून विजय नोंदवला. आर जे इंटरनॅशनल स्कूल संघाने प्रथम खेळताना १३.२ षटकात सर्वबाद ४२ असे माफक लक्ष्य उभे केले. देवगिरी ग्लोबल अकॅडमीने केवळ दोनच षटकात बिनबाद ४६ धावा फटकावत दहा विकेटने सामना जिंकला. या सामन्यात राघव नाईक (३७), स्वराज रणसिंग (३-५), सुशांत (२-७) व कबीर लांडगे (२-७) यांनी लक्षवेधक कामगिरी बजावली.
तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना किड्स किंगडम इंग्लिश स्कूल संघाने नऊ बाद ६७ असे माफक लक्ष्य उभे केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना एसएफएस स्कूल संघाने अवघ्या ४.३ षटकात दोन बाद ७१ धावा फटकावत आठ विकेटने दणदणीत विजय साकारला. या लढतीत दीपक शर्मा (३५), ऋषिकेश डोंगरे (३२), आयुष रोकडे (२८) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत प्रतीकने ७ धावांत चार विकेट घेत सामना गाजवला. सोलोमन (३-१४) व अॅलन बत्तीसे (२-५) यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
संक्षिप्त धावफलक : १) केम्ब्रिज स्कूल : २० षटकात चार बाद २२५ (व्योम खर्चे ९०, स्पर्श पाटणी ६१, विवेक कोठारी ८, समर्थ तोतला नाबाद ३०, इतर ३५, व्यंकटेश जाधव २-३५, स्वामी जोरे १-३०) विजयी विरुद्ध राजा शिवाजी हायस्कूल : १५.१ षटकात सर्वबाद ४९ (शिवराज दळवी ८, व्यंकटेश जादव १०, कार्तिक गोरे ५, ह्रषिकेश सुरडकर नाबाद ५, इतर १६, व्योम खर्चे ५-११, ध्रुव देखणे २-१९, सर्वेश पाटील १-९, शौर्य मित्तल १-३). सामनावीर : व्योम खर्चे.
२) आर जे इंटरनॅशनल स्कूल : १३.२ षटकात सर्वबाद ४२ (ओम पगारिया ८, इशान मगर ५, नमन झवर नाबाद ५, स्वराज रणसिंग ३-५, सुशांत २-७, कबीर लांडगे २-७, कृष्णकांत पावडे १-१३, सर्वज्ञ राजुरे १-२) पराभूत विरुद्ध देवगिरी ग्लोबल अकॅडमी : २ षटकात बिनबाद ४६ (राघव नाईक नाबाद ३७, आर्यन बन्सवाल नाबाद ६). सामनावीर : स्वराज रणसिंग.
३) किड्स किंगडम इंग्लिश हायस्कूल : २० षटकात नऊ बाद ६७ (सागर गुट्टे ८ नवीन नाबाद ५, आयू चोरडिया नाबाद २८, प्रतीक ४-७, सोलोमन ३-१४, अॅलन बत्तीसे २-५) पराभूत विरुद्ध एसएफएस स्कूल : ४.३ षटकात दोन बाद ७१ (ऋषिकेश डोंगरे नाबाद ३२, दीपक शर्मा ३५, कौस्तुभ शेवाळे (२-६). सामनावीर : प्रतीक.