
वडाळा येथे १३, १४ जानेवारी रोजी होणाऱ्या परिषदेला जगभरातील क्रीडा तज्ज्ञांची उपस्थिती
मुंबई : मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे १३ व १४ जानेवारी रोजी तिसऱ्या आंतरराष्ट्रीय दोन दिवसीय क्रीडा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्राचार्य डॉ घनश्याम ढोकरट यांनी दिली.
वडाळ्यातील भारतीय क्रीडा मंदिरात दोन दिवसीय क्रीडा परिषद होणार आहे. शारीरिक शिक्षण महाविद्यालय (वडाळा) हे गेल्या ४६ वर्षांपासूान खेळ आणि क्रीडा संशोधन क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून कार्यरत आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव दीपक शेटे, प्राचार्य घनश्याम ढोकरट यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रीडा परिषद होत आहे.
या परिषदेचे शीर्षक ‘ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह ऑन फिजिकल एज्युकेशन स्पोर्ट्स फॉर पीस, एजिंग अवेरनेस, योग आणि रिक्रिएशन’ असे आहे. या क्रीडा परिषदेचे उद्घाटन १३ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता आसाम राज्यातील दिब्रुगड येथील अनिरुद्धदेव क्रीडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ जे पी वर्मा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनावणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रवींद्र कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राचार्य ढोकरट यांनी दिली.
खेळ, क्रीडा शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा संशोधन, क्रीडा मानसशास्त्र योग आणि मनोरंजन अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी जगभरातून अनेक क्रीडा तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने मुहम्मद ली (मलेशिया), लिमन बून हुई (अर्जेटिना), एदुआर्डो कॅब्रेरा (स्पेन), जेम्मा क्वीनल (यूके), ऑरेलिए गार्सिया (स्वित्झर्लंड), जी एल खन्ना (फरिदाबाद), डॉ राजेश कुमार (हैदराबाद), डॉ पियुष जैन (नवी दिल्ली), डॉ सी पी सिंग (मध्य प्रदेश), सी डी आगाशे (छत्तीसगड), प्रो चंद्रशेखर (मदुराई), सुब्रता डे (मणिपूर), सी वीरेंद्र (हैदराबाद), नीती बंडोपाध्याय (पश्चिम बंगाल), टी के बेरा (पश्चिम बंगाल), अनिल करवंदे (नागपूर), मन्मथ घरोटे (लोणावळा), सोपान कांगणे (पुणे), डॉ मकरंद जोशी (छत्रपती संभाजीनगर), शत्रुंजय कोटे (छत्रपती संभाजीनगर), डॉ सिंकू कुमार (नांदेड), डॉ परिहार (नांदेड), डॉ मनोज रेड्डी (मुंबई), डॉ विश्वंभर जाधव (मुंबई) हे क्रीडा क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत अशी माहिती प्राचार्या ढोकरट यांनी दिली.
तिसऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषदेचे सचिव म्हणून डॉ राजेंद्र ढाकणे, सहसचिव म्हणून डॉ नीतू जोशी व डॉ किशोर मारू हे काम पाहणार आहेत. भारतातील विविध राज्यातील ७० पेक्षा अधिक क्रीडा संशोधक आपले निबंध सादर करणार आहेत. १२ जानेवारी रोजी या परिषदेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स मसाज या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत मलेशियाचे ख्यातनाम डॉ लिम बन हुई हे मार्गदर्शन करणार आहेत. १४ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता क्रीडा परिषदेचा समारोप होईल. या प्रसंगी उच्च शिक्षण मुंबई विभागाचे सहसंचालक डॉ रुपेश राऊत, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ अजय भामरे यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ घनश्याम ढोकरट यांनी दिली.