
छत्रपती संभाजीनगर : क्रेझेन्ट युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी चेन्नई (तामिळनाडू) येथे नुकत्याच झालेल्या पश्चिम आणि दक्षिण विभाग युनिव्हर्सिटी कराटे स्पर्धेत ५५ किलो वजन गटात एमजीएम विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरची खेळाडू साक्षी वाल्मिक शिरसाठ हिने घवघवीत यश संपादन केले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधित्व करताना साक्षी शिरसाठ हिने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे तिची रोहतक (हरियाणा) येथे १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. तिला प्रशिक्षक विजय टकले, अजय राऊत यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या घवघवीत यशाबद्दल एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू अंकुशराव कदम, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास मोतीयेळे आदींनी साक्षीचे अभिनंदन केले आहे.