
व्हेरॉक शालेय क्रिकेट स्पर्धा : चिन्मय गोरवाडकर, पौरस मिसाळ, रुतुराज काळे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : १६व्या व्हेरॉक करंडक आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत सरस्वती भुवन हायस्कूल, वूड रिज हायस्कूल आणि एंजेल किड्स इंटरनॅशनल स्कूल या संघांनी दणदणीत विजयासह आपली आगेकूच कायम ठेवली. या सामन्यांमध्ये चिन्मय गोरवाडकर, पौरस मिसाळ आणि रुतुराज काळे या खेळाडूंनी सामनावीर पुरस्कार पटकावला.
एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या सामन्यात सरस्वती भुवन हायस्कूल संघाने गायकवाड ग्लोबल स्कूलचा चार विकेट राखून पराभव केला. गायकवाड ग्लोबल स्कूलने सात बाद १३० धावा काढल्या. सरस्वती भुवन हायस्कूलने सहा बाद १३१ धावा फटकावत चार विकेट राखून सामना जिंकला. या सामन्यात श्रेयांश बोरसे (३५), यज्ञ पटेल (३४), पार्थ अहिरे (२५) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत चिन्मय गोरवाडकर याने २५ धावांत पाच विकेट घेत सामना गाजवला. मृदुल निकम याने २४ धावांत चार विकेट घेत आपला ठसा उमटवला.
दुसऱ्या सामन्यात वूड रिज हायस्कूलने प्रियदर्शिनी मनपा हायस्कूल संघावर तब्बल १६७ धावांनी मोठा विजय नोंदवला. वूड रिज हायस्कूलने दोन बाद २४१ असा धावांचा डोंगर उभारला. प्रियदर्शनी मनपा हायस्कूलचा संघ ७४ धावांत सर्वबाद झाला. या सामन्यात पौरस मिसाळ (८५), समरवीर पाटील (६९) यांनी धमाकेदार अर्धशतके ठोकत सामना गाजवला. आरुष मलके याने १८ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत ओमकार पंचगल्ले (२-०), साहस पाटील (२-१७) व पौरस मिसाळ (२-१४) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
तिसऱ्या सामन्यात एंजेल किड्स इंटरनॅशनल स्कूलने तीन बाद २५३ असा धावांचा डोंगर उभारून सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना द वर्ल्ड स्कूल संघ ९.४ षटकात नऊ बाद ५५ धावा काढल्या. एंजेल किड्स स्कूलने तब्बल १९८ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात ओमकार कर्डिले (९२), रुतुराज काळे (६०), अभिराम गोसावी (४६) यांनी बहारदार फलंदाजी केली. गोलंदाजीत ऋतुराज काळे याने ११ धावांत चार विकेट घेत अष्टपैलू कामगिरी नोंदवली. साद शेख याने दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : १) गायकवाड ग्लोबल स्कूल : २० षटकात सात बाद १३० (मृदुल निकम १८, यज्ञ पटेल ३४, पार्थ अहिरे नाबाद २५, इतर ४२, चिन्मय गोरवाडकर ५-२५, एकलव्य मोंढेकर १-९, अभिनव जोशी १-२७) पराभूत विरुद्ध सरस्वती भुवन हायस्कूल : १६ षटकात सहा बाद १३१ (श्रेयांश बोरसे ३५, स्वयम पवार १२, चिन्मय गोरवाडकर १०, अथर्व खळीकर नाबाद १३, अभिषेक कचेश्वर ६, इतर ४८, मृदुल निकम ४-२४, पार्थ अहिरे १-२२, यज्ञ पटेल १-२३). सामनावीर : चिन्मय गोरवाडकर.
२) वूड रिज हायस्कूल : २० षटकात दोन बाद २४१ (राजवीर मुळे १७, समरवीर पाटील ६९, पौरस मिसाळ ८५, राजवर्धन देशमुख नाबाद १४, इतर ५६, आरुष मलके १-४६, धीरज १-४५) विजयी विरुद्ध प्रियदर्शनी मनपा हायस्कूल : १६ षटकात सर्वबाद ७४ (गणेश सोनुने ८, रितेश सतवंत १३, आरुष मलके १८, धीरज ९, तबरेझ लड्डू ७, पौरस मिसाळ २-१४, समरवीर पाटील २-२०, साहस पाटील २-१७, ओमकार पंचगल्ले २-०, अक्षत १-१). सामनावीर : पौरस मिसाळ.
३) एंजेल किड्स इंटरनॅशनल स्कूल : २० षटकात तीन बाद २५३ (अभिराम गोसावी ४६, ओमकार कर्डिले ९२, रुतुराज काळे नाबाद ६०, वेद शर्मा नाबाद २०, इतर ३५, तनिष्क मालाणी १-२९, अथर्व गायकवाड १-४८) विजयी विरुद्ध द वर्ल्ड स्कूल : ९.४ षटकात नऊ बाद ५५ (यश पारे २३, विहान पाठक ८, रुतुराज काळे ४-११, साद शेख २-१, आदित्य राठोड १-८, ओमकार कर्डिले १-१०). सामनावीर : रुतुराज काळे.