
अमरहिंद मंडळ शालेय क्रीडा स्पर्धा
मुंबई : अमरहिंद मंडळाच्या वतीने आयोजित शालेय कबड्डी, लंगडी आणि खो-खो स्पर्धेमध्ये वडाळ्याच्या श्री गणेश विद्यालय संघाने चमकदार कामगिरी करत दुहेरी विजेतेपद मिळवले.
लंगडी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्री गणेश विद्यालय संघाने मुलांच्या गटात गिरगावच्या चिकित्सक समूह शाळेला तर मुलींच्या गटात सायनच्या गौरीदत्त मित्तल विद्यालय संघाला पराभूत केले. या स्पर्धेत मुलांच्या १२ आणि मुलींच्या ११ संघांनी सहभाग घेतला होता.
रोमांचक विजय
मुलांच्या अंतिम सामन्यात वडाळ्याच्या श्री गणेश विद्यालयाने शिरोळकर हायस्कूलवर २७-२५ असा दोन गुणांनी विजय मिळवला. शेवटच्या सहा मिनिटांत रंगलेल्या या सामन्यात श्री गणेश विद्यालयाच्या प्रथम खेत्रे आणि सुजित यादव यांनी प्रत्येकी १.१० मिनिटे उत्कृष्ट संरक्षण करत चमक दाखवली. तसेच, अल्पेश मितेने सात गुण, अर्जुन पाटीलने चार गुण आणि श्रवण पाटीलने तीन गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. गिरगावच्या चिकित्सक समूह शाळेच्या वृषभ लांबारने सहा गुण, तर वेदांत कोळकर याने चार गुण मिळवत संघाला विजयासाठी झुंजवले, परंतु विजय मिळवण्यात ते अपयशी ठरले.
मुलींच्या गटातही गणेश विद्यालयाचे वर्चस्व
मुलींच्या अंतिम सामन्यात श्री गणेश विद्यालयाने सायनच्या गौरीदत्त मित्तल विद्यालयाला १५-१३ असा दोन गुणांनी पराभूत केले. या सामन्यात रेहा पोस्टुरने १.५० आणि १.१० मिनिटे उत्कृष्ट संरक्षणासह सात गुणांची कमाई केली. वेदांती भूरवणेने १.४० मिनिटे संरक्षण करत दोन गुण मिळवले, तर पलक गाणेकर आणि आर्या पायकोळी यांनी प्रत्येकी १.१० मिनिटे संरक्षण करत दोन गुण मिळवले. गौरीदत्त मित्तल विद्यालयाच्या भूमी घाडीगावकरने १.१० मिनिटे उत्कृष्ट संरक्षण केले. तसेच वेदिका केकाणेने तीन गुण, आणि प्रतिज्ञा कोरी व सोनाली दर्गे यांनी प्रत्येकी दोन गुण मिळवले, परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
संरक्षक : श्रुतिका मोरे (श्री गणेश), सुजित यादव (श्री गणेश).
आक्रमक : आर्या यादव (गौरीदत्त मित्तल), वृषभ लांबोर (चिकित्सक).
अष्टपैलू : रेहा पोस्टुर (श्री गणेश), अर्जुन पाटील (श्री गणेश).