
ईश्वरी सावकार, आयेशा शेख, ऐश्वर्या वाघ यांची चमकदार कामगिरी
पुणे : बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर २३ महिला टी २० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने गोवा महिला संघावर ८९ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. ईश्वरी सावकार हिने नाबाद ९१ धावांची खेळी करुन सामना गाजवला.
रायपूर येथे हा सामना झाला. महाराष्ट्र महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात एक बाद १७५ अशी भक्कम धावसंख्या उभारली. सलामीवीर खुशी मुल्ला २७ धावा काढून बाद झाली. तिने चार चौकार मारले. खुशी मुल्ला व ईश्वरी सावकार या जोडीने ७२ धावांची भागीदारी करुन संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. त्यानंतर ईश्वरी सावकार आणि आयेशा शेख या जोडीने धमाकेदार फलंदाजी केली. ईश्वरी आणि आयेशा या जोडीने नाबाद १०३ धावांची भागीदारी करत डावाला भक्कम आकार दिला. ईश्वरी सावकार हिने ७० चेंडूत नाबाद ९१ धावांची आक्रमक खेळी केली. तिने तीन उत्तुंग षटकार व दहा चौकार मारले. आयेशा शेख हिने अवघ्या २५ चेंडूत नाबाद ५१ धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी केली. तिने चार टोलेजंग षटकार व तीन चौकार ठोकले. गोवा संघाकडून सेजल सातर्डेकर हिने ३९ धावांत एक बळी मिळवला.
गोवा महिला संघासमोर विजयासाठी १७६ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना गोवा संघ १७.१ षटकात ८६ धावांवर सर्वबाद झाला. हर्षदा कदम हिने सर्वाधिक २७ धावा फटकावल्या. तनिषाने १५, मितालीने १५ धावांचे योगदान दिले.
महाराष्ट्र महिला संघाकडून ऐश्वर्या वाघ हिने प्रभावी गोलंदाजी करत १८ धावांत तीन विकेट घेतल्या. यशोदा घोगरे (१-८), आदिती वाघमारे (१-१४), खुशी मुल्ला (१-१९), मिरजकर (१-१६), श्वेता सावंत (१-०) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.