
डर्बन : दक्षिण आफ्रिकेत सध्या सुरू असलेल्या एसए २० क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन याने जोरदार षटकार ठोकला. गॅलरीत बसलेल्या एका प्रेक्षकाने एका हाताने झेल पकडून तब्बल ९० लाख रुपये जिंकले आहेत.
डर्बन सुपर जायंट्स संघाकडून खेळत असताना केन विल्यमसनने शानदार षटकार मारला. चेंडू थेट गॅलरीत गेला, तिथे एका प्रेक्षकाने एका हाताने झेल घेतला आणि सुमारे ९० लाख रुपये जिंकले.
स्पर्धेतील दुसरा सामना डर्बन सुपर जायंट्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना चार बाद २०९ अशी मोठी धावसंख्या उभारली. यावेळी विल्यमसनने ४० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह संघासाठी ६० धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. त्याच डावात, विल्यमसनने लेग साईडवर षटकार मारला, जो स्टँड मधील एका प्रेक्षकाने टिपला.
एसए २० क्रिकेट स्पर्धेत एका हाताने झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला २० लाख रँडचे बक्षीस दिले जाते. विल्यमसनच्या षटकारावर घेतलेल्या झेलाचा व्हिडिओ एसए २० ने शेअर केला होता आणि त्यात असे सांगण्यात आले होते की ज्या व्यक्तीने एका हाताने कॅच घेतला त्याने २ दशलक्ष रँड (सुमारे ९० लाख भारतीय रुपये) बक्षीस जिंकले.
फक्त दोन धावांनी विजय
डर्बन सुपर जायंट्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी २०० धावांचा टप्पा ओलांडला, पण शेवटी डर्बन सुपर जायंट्सने फक्त दोन धावांनी विजय मिळवला.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डर्बन सुपर जायंट्सने २० षटकांत ४ बाद २०९ धावा केल्या. या काळात विल्यमसनने संघासाठी सर्वात मोठी ६० धावांची खेळी खेळली. सुपर जायंट्सच्या या एकूण धावसंख्येनंतर, ते आरामात जिंकतील असे वाटत होते, परंतु प्रिटोरिया कॅपिटल्सकडून एक कठीण लढत पाहायला मिळाली.
लक्ष्याचा पाठलाग करताना प्रिटोरिया कॅपिटल्सने २० षटकांत ६ बाद २०७ धावा केल्या. संघाला फक्त दोन धावांनी पराभव स्वीकारावा लागला. संघाकडून सलामीवीर म्हणून आलेल्या रहमानउल्लाह गुरबाजने ४३ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांसह ८९ धावा करत सर्वात मोठी खेळी केली.