सॅम कोन्स्टासचे भविष्य उज्ज्वल : स्टीव्ह स्मिथ 

  • By admin
  • January 11, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

मेलबर्न : विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना भिडणारा ऑस्ट्रेलियाचा युवा क्रिकेटपटू सॅम कोन्स्टासचे कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने कौतुक केले आहे. स्मिथ त्याचा चाहता बनला असून त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचे स्मिथने सांगितले. 

येत्या २९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली आहे. यामध्ये स्टीव्ह स्मिथला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत तो संघाचे नेतृत्व करेल. स्मिथने सॅम कॉन्स्टास याचे कौतुक केले. स्मिथ म्हणाला की, ‘मी त्याला फलंदाजी करताना पाहिले आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे.’

कोन्स्टास याने अलीकडेच भारताविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पण केले. १९ वर्षीय फलंदाजाने पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावले होते. ऑस्ट्रेलिया संघाने हा कसोटी सामना १८४ धावांनी जिंकला होता. दोन सामन्यांच्या चार डावात त्याने २८.२५ च्या सरासरीने ११३ धावा केल्या. या काळात त्याची सर्वोत्तम कामगिरी ६० धावा होती. आता चाहते श्रीलंकेविरुद्धही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा करत आहेत.

स्मिथने फॉक्स स्पोर्ट्सला सांगितले की, ‘एक फलंदाज म्हणून, तुम्ही स्वतःकडून काही प्रमाणात शिकू शकता. तुम्हाला जसे खेळायचे आहे तसे खेळा कारण ते तुमचे करिअर आहे. तिथून, तुम्ही अनुभवांमधून शिकता. मी त्याला अशी फलंदाजी करताना पाहिले आहे आणि मी त्याला शिल्ड सामन्यांमध्ये पारंपारिकपणे फलंदाजी करताना पाहिले आहे आणि तो खरोखरच चांगली कामगिरी करतो.’

स्मिथ पुढे म्हणाला की, ‘त्याच्याकडे प्रतिभा आहे आणि मला वाटते की जेव्हा तो दबाव हाताळू इच्छितो तेव्हा त्याच्याकडे क्षमता आहे. त्याच्याकडे गोलंदाजांवर खूप दबाव आणण्याची क्षमता आहे. हे असे काहीतरी आहे जे तो शिकेल. तो फक्त १९ वर्षांचा आहे, तो एक लहान मुलगा आहे. त्याला खूप अनुभव येतील आणि तो त्यातून शिकेल. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे.’

कोहली सोबत झाला होता वाद 

सॅम फलंदाजी शिवाय विराट कोहली सोबतच्या वादामुळे चर्चेत आला होता. ही घटना मेलबर्न कसोटीतील आहे. विराट कोहली आणि कॉन्स्टासमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर पंचांनी मध्यस्थी केली आणि प्रकरण शांत केले. या घटनेनंतर आयसीसीने विराट कोहलीला त्याच्या मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावला आणि त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जोडला गेला. जसप्रीत बुमराहशी देखील सॅम याने वाद घातला होता. या घटनेची देखील खूप चर्चा झाली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *