
राजकोट : पहिल्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंड संघाविरुद्ध भारतीय संघाने सहा विकेट्सने विजय मिळवला. मात्र, भारतीय संघाची कर्णधार स्मृती मानधना या विजयावर आनंदी नाही. तिने भारतीय खेळाडूंच्या खराब क्षेत्ररक्षणावर चिंता व्यक्त केली.
भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघ विजयी झाल्यानंतरही संघाची कर्णधार स्मृती मानधना फार खूश नाही. तिने भारतीय खेळाडूंच्या खराब क्षेत्ररक्षणावर निशाणा साधत आयर्लंड संघाला १८० धावांत गुंडाळायला हवे होते असे सांगितले.
खराब क्षेत्ररक्षणामुळे मानधना संतापली
भारताने १४ व्या षटकात आयर्लंडला ४ बाद ५६ धावांवर रोखले होते. परंतु, कर्णधार गॅबी लुईस (९२) आणि लीह पॉल (५९) यांच्या खेळीमुळे आयर्लंड संघाला ७ बाद २३८ धावा करता आल्या. भारताने जास्त अडचणीशिवाय लक्ष्य गाठले असले तरी, मानधनाने खराब क्षेत्ररक्षणाबद्दल चिंता व्यक्त केली. सामन्यानंतर मानधना म्हणाली की, ‘आपल्याला आपले क्षेत्ररक्षण सुधारण्याची गरज आहे. आपण त्यांना १८० पर्यंत मर्यादित ठेवायला हवे होते आणि भविष्यातही असेच करण्याचे ध्येय ठेवू. आपल्याला मैदानावर जाऊन आपल्या योजना राबवाव्या लागतील, हे महत्त्वाचे असेल.’
गोलंदाजांच्या प्रयत्नांचे कौतुक
यावेळी मानधनाने भारताच्या गोलंदाजीचे कौतुक केले. ती म्हणाली, ‘गोलंदाजांनी चांगले काम केले. कारण ते अशा विकेटवर गोलंदाजी करत होते जिथे कोणासाठीही काहीही नव्हते. आपल्याला प्रत्येक सामन्यात आपल्या योजनेनुसार काम करावे लागेल.’
प्रतिका रावलचे महत्त्वाचे योगदान
या सामन्यात प्रतिका रावलने शानदार कामगिरी केली. तिने ९६ चेंडूत ८९ धावा करून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या काळात तिने सहा चौकार आणि एक षटकार मारला. या दमदार कामगिरीसाठी तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
प्रतिका म्हणाली की, ‘मी निकालाबद्दल किंवा मोठ्या डावाबद्दल विचार करत नव्हते. मी एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करते. जेव्हा चेंडू माझ्या बॅटवर आला तेव्हा मी चौकार मारण्याचा प्रयत्न केला.
तेजल हसबनीसने आनंद व्यक्त केला
दरम्यान, मधल्या फळीतील फलंदाज तेजल हसबनीस हिने नाबाद ५३ धावा करत शानदार पुनरागमन केले. तेजल म्हणाली की, ‘संघाच्या विजयात योगदान देऊ शकले याचा मला आनंद आहे आणि हेच महत्त्वाचे आहे. अर्धशतकापेक्षा विजय महत्त्वाचा आहे. माझी योजना परिस्थितीनुसार खेळण्याची होती. सुरुवातीला मी स्ट्राइक रोटेट केला आणि नंतर चौकार मारायला सुरुवात केली.’