पीवायसी-पुसाळकर प्रीमियर क्रिकेट लीग रविवारपासून रंगणार

  • By admin
  • January 11, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

१६ संघांचा सहभाग, क्रिश शहा सर्वात महागडा खेळाडू 

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने ११व्या पीवायसी- पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १२ ते १९ जानेवारी या कालावधीत पीवायसी मैदानावर होणार आहे.

या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे सहसचिव सारंग लागू आणि पुसाळकर सुरक्षा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रोहन पुसाळकर यांनी सांगितले की, ‘स्पर्धेचे हे अकरावे वर्ष आहे. या स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले आहेत. एकूण २०० खेळाडूंच्या सहभागातून घेण्यात आलेल्या लिलावात क्रिश शहा (५ हजार पॉईंट्स, जीएम टायफून्स) हा महागडा खेळाडू ठरला असून रोहन छाजेड (४५०० पॉईंट्स, जीएम टायफून्स), अंकुश जाधव (४५०० पॉईंट्स, ए अँड ए शार्क्स), श्रीनिवास चाफळकर (४५०० पॉईंट्स, ओव्हनफ्रेश टस्कर्स),  हर्षल गंद्रे (४५०० पॉईंट्स, ओव्हनफ्रेश टस्कर्स), हर्षा जैन (४५०० पॉईंट्स, रांजेकर-देवगावकर लायन्स), इशांत रेगे (४५०० पॉईंट्स, सुप्रीम बेल्फिन्स टायगर्स)यांना संघाने रिटेन केले आहे.  

विविध क्रीडा प्रकारांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी पीवायसी क्लब नेहमीच आघाडीवर असतो. या स्पर्धेला पुसाळकर सुरक्षा कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेडचे रोहन पुसाळकर यांचे सलग सहाव्या वर्षी प्रायोजकत्व लाभले आहे. होडेक वायब्रेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांचे पण सहप्रायोजक म्हणून सलग सहा वर्ष सहकार्य लाभले आहे. बेलवलकर हाऊसिंग लिमिटेड, रांजेकर रियालिटी, चाफळकर करंदीकर कन्स्ट्रक्शन, सुप्रीम इन्फ्रा, नॉक ९९ यांचे सहप्रायोजकत्व मिळाले आहे.

क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव अविनाश रानडे म्हणाले की, ‘स्पर्धेत प्रत्येक संघात एका सामन्यासाठी प्रत्येकी ९ खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे सामने हे ६ षटकांचे होणार आहेत. स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू असून सर्व सामने सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत होणार आहेत आणि काही सामने प्रकाशझोतात देखील होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना १९ जानेवारी रोजी होणार आहे.

या स्पर्धेत गरगंटू डिस्ट्रॉयर्स (संघमालक रोहन पुसाळकर व निरंजन किर्लोस्कर), सुप्रीम बेल्फिन्स टायगर्स (आमिर आजगावकर व सचिन बेलगलकर), ट्रूस्पेस नाईट्स (विश्वेश कट्क्कर व कपिल त्रिमल), पंडित जावडेकर डॉल्फिन्स (राहुल पंडित व आनंद परचुरे), रावेतकर बुल्स (पराग चोपडा व अमोल रावेतकर), ए अँड ए शार्क्स (अंकुश जाधव), लाईफसायकल स्नो लेपर्डस (नचिकेत जोशी व उल्हास जोशी), ओव्हन फ्रेश टस्कर्स (जेहान कोठारी व समीर बाकरे), बेलवलकर बॉबकॅट्स (नकुल बेलवलकर व नील बेलवलकर), नॉक ९९ पुणेरी बाप्पा (आशिष देसाई), देवगावकर रांजेकर लायन्स (अनिरुद्ध रांजेकर व मंदार देवगावकर), कोतवाल युनिकॉर्न (क्षितिज कोतवाल), बदामीकर स्टार्स (सिद्धार्थ बदामीकर), पायरेट्स (अभिजीत खानविलकर), चिताज (तुषार मेंगळे व प्रशांत कुलकर्णी), जीएम टायफून्स (अश्विन शहा) हे १६ संघ विजेतेपद पटकावण्यासाठी झुंजणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेबद्दल अधिक माहिती देताना पीवायसीचे सहसचिव सारंग लागू म्हणाले की, ‘स्पर्धेतील १६ संघांची ३ गटात विभागणी करण्यात आली आहे. तसेच, या तीनही गटांतील अव्वल व दुय्यम संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार असून आणखी दोन संघ गुणसरासरी आणि नेटरनरेटच्या आधारावर पात्र ठरणार आहेत. प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याचा व क्रिकेटवरचे प्रेम व्यक्त करण्याचा अनुभव या माध्यमांतून सभासदांना मिळणार आहे. या उपक्रमाचे स्वरूप जरी स्पर्धात्मक असले, तरी पण प्रत्यक्षात सभासदांना या खेळाची मजा लुटता येणार आहे. विजेत्या संघाला विजय पुसाळकर स्मृती करंडक देण्यात येणार असून याशिवाय वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत.

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये अविनाश रानडे, अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, शिरीष आपटे, सिद्धार्थ दाते, विकास आचलकर यांचा समावेश आहे. निरंजन गोडबोले हे स्पर्धेचे डायरेक्टर म्हणून काम पाहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *