
छत्रपती संभाजीनगर : पुणे येथे झालेल्या पुनित बालन प्रस्तुत राज्यस्तरीय खुल्या सबज्युनियर ज्युदो चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या ओमकार काकड याने सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण कामगिरीमुळे ओमकारची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
बालेवाडी (पुणे) क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत ओमकार काकड याने ४० किलो खालील वजनगटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक प्राप्त केले. तर अर्जुन नरोडे याने ४५ किलो वजन गटात कांस्यपदक मिळवले. मुलींच्या गटात २८ किलो वजन गटात आरोही जाधव आणि ५७ किलो वरील गटात सौम्या साकला हिने पहिल्यांदा राज्य स्पर्धेत सहभाग नोंदवत कांस्यपदक मिळवले.
या संघाचे प्रशिक्षक अशोक ज॔गमे आणि अमित साकला हे होते. संघ व्यवस्थापक म्हणून कुणाल गायकवाड हे होते. जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, उपाध्यक्ष भास्कर जाधव, भीमाशंकर नावंदे, सचिव अतुल बामनोदकर, कोषाध्यक्ष सुरेश छापरवाल, सहसचिव विश्वास जोशी, प्रसन्न पटवर्धन, विश्वजीत भावे, भीमराज रहाणे, मनिंद्र बिलवाल, सुनील सिरसवाल, दत्तु पवार, विजय सिरसवाल, तसेच राज्य संघटनेचे तांत्रिक सचिव दत्ता आफळे आदींनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.