
अर्शीन कुलकर्णीचे धमाकेदार शतक, अंकित बावणे, निखिल नाईक, मुकेश चौधरीची चमकदार कामगिरी
विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट
वडोदरा : अर्शीन कुलकर्णी (१०७), अंकित बावणे (६०), निखिल नाईक (नाबाद ५२) आणि मुकेश चौधरी (३-४४) यांच्या अफलातून कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाने पंजाब संघाचा तब्बल ७० धावांनी पराभव करुन विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शतकवीर अर्शीन कुलकर्णी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
कोटम्बी स्टेडियमवर महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यात बाद फेरीचा सामना झाला. आयपीएल स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सहा बाद २७५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब संघ ४४.४ षटकात २०५ धावांवर सर्वबाद झाला. महाराष्ट्र संघाने ७० धावांनी शानदार विजय साकारत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या महाराष्ट्र संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर आणि कर्णधार रुतुराज गायकवाड (५) आणि सिद्धेश वीर (०) हे आक्रमक फलंदाज स्वस्तात बाद झाले. आठ धावांवर महाराष्ट्राचे दोन खंदे फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर युवा आक्रमक फलंदाज अर्शीन कुलकर्णी आणि अनुभवी अंकित बावणे या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी करुन डावाला आकार दिला.
अंकित बावणे याने ८५ चेंडूत ६० धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी करुन बाद झाला. अंकितने सात चौकार मारले. त्यानंतर राहुल त्रिपाठी (१५), अजीम काझी (२) हे धमाकेदार फलंदाज लवकर बाद झाले. अर्शीन कुलकर्णी आणि निखिल पवार यांनी धावगती कायम ठेवली. ४५व्या षटकात अर्शीन कुलकर्णी याची आक्रमक शतकी खेळी संपुष्टात आली. अर्शीन कुलकर्णी याने या महत्त्वाच्या सामन्यात धमाकेदार फलंदाजी करत बहारदार शतक ठोकले. अर्शिन याने १३७ चेंडूंचा सामना करत १०७ धावा फटकावल्या. त्याने चौदा चौकार ठोकले. निखिल पवार याने त्याला अप्रतिम साथ दिली. निखिलने अवघ्या २९ चेंडूंत नाबाद ५२ धावांची स्फोटक खेळी साकारली. निखिलने तीन उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. सत्यजीत बच्छाव याने १५ चेंडूत नाबाद २० धावा फटकावल्या. त्याने एक षटकार व एक चौकार मारला. अखेरच्या काही षटकांमध्ये निखिल व सत्यजीत यांनी धमाकेदार फलंदाजी करत सामन्यावर संघाला वर्चस्व मिळवून दिले.

पंजाब संघाकडून अर्शदीप सिंग याने ५६ धावांत तीन विकेट घेतल्या. नमन धीर याने २९ धावांत दोन बळी टिपले. अभिषेक शर्मा याने ४२ धावांत एक गडी बाद केला.
आयपीएल स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या पंजाब संघाला विजयासाठी २७६ धावांची आवश्यकता होती. प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात सावधपणे केली. मुकेश चौधरीने चौथ्या षटकात प्रभसिमरनला १४ धावांवर बाद करुन पंजाबला पहिला धक्का दिला. पाठोपाठ अभिषेक शर्माला १९ धावांवर बाद करुन मुकेशने दुसरा धक्का दिला. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच नेहल वढेरा (६), रमणदीप सिंग (२), अनमोल मल्होत्रा (१०), नमन धीर (१२) असे आक्रमक फलंदाज स्वस्तात बाद होऊन तंबूत परतले. त्यामुळे पंजाब संघ अडचणीत सापडला.
पंजाब संघाची एकवेळ सहा बाद ११९ अशी बिकट स्थिती झाली होती. अनमोलप्रीत सिंग (४८), सनवीर सिंग (२४) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अर्शदीप सिंग याने ३९ चेंडूत ४९ धावा फटकावत सामन्यात चुरस आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत सामना पंजाबच्या हातातून निसटला होता. त्याने तीन षटकार व तीन चौकार मारले. सिद्धेश वीर याने रघु शर्माला धावबाद केले. प्रदीप दधे याने अर्शदीपला बाद करत संघाच्या दिमाखदार विजयावर शिक्कामोर्तब केले.
महाराष्ट्र संघाकडून मुकेश चौधरी याने ४४ धावांत तीन विकेट घेत सामना गाजवला. मुकेशने पहिला स्पेल अप्रतिम टाकला. प्रदीप दधे याने ३१ धावांत दोन गडी टिपले. रजनीश गुरबानी (१-४४), अर्शीन कुलकर्णी (१-७), सत्यजीत बच्छाव (१-४१), अजीम काझी (१-२४) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.