विश्वचषक खो-खो स्पर्धेच्या प्रसारासाठी तोरसकर, संगवे, कदम यांची निवड 

  • By admin
  • January 12, 2025
  • 0
  • 65 Views
Spread the love

 नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेसाठी खो-खो खेळाचा ग्रामीण ते जागतिक स्तरापर्यंत डिजिटल, सोशल मीडिया व वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रचार-प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या तिघांची निवड झाली आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव बाळासाहेब तोरसकर (मुंबई), प्रसिद्धी समितीचे चेअरमन अजितकुमार संगवे (सोलापूर) व सदस्य भूषण  कदम (पुणे) यांचा यात समावेश आहे.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस डॉ चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड गोविंद शर्मा यांनी तिघांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

बाळासाहेब तोरसकर

सहसचिव बाळासाहेब शिवाजी तोरसकर यांनी खेळ आणि समाजकार्य यांचा सुरेख संगम साधत खो-खोच्या क्षेत्रात आपले स्थान अधोरेखित केले. राष्ट्रीय खो-खो पंच, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या प्रसिद्धी समितीचे चेअरमन म्हणून त्यांनी मोलाचे कार्य केला आहे. मुंबई खो-खो संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेत. तसेच मुंबई व महाराष्ट्रात खो-खोच्या प्रसिद्धीसाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे. मुंबईत झालेल्या एकमेव राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे संयोजन सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

अजितकुमार संगवे 
अजितकुमार बापूराव संगवे हे महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या प्रसिद्धी समिती चेअरमन आहेत. पत्रकार, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खो-खोपटू, राष्ट्रीय खो-खो पंच, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या किशोरी खो-खो संघाचे प्रशिक्षक अशा अनेक भूमिका त्यांनी जबाबदारी पार पाडलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशन प्रसिद्धी समितीचे सदस्य व सचिव म्हणून त्यांनी कार्य केले आहे. सध्या ते सोलापूर खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस आहेत. तसेच ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आहेत. 

भूषण कदम 
भूषण प्रकाश कदम यांची प्रवर्तक म्हणून निवड झाली आहे. फोटोग्राफर म्हणून ते सक्रिय आहेत. १२ वर्षे खेळ आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनकरिता खेळाचा प्रचार-प्रसार आणि प्रवर्तक म्हणून काम केले आहे. माजी प्रसिद्धी समिती सचिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन. पुणे जिल्हा खो-खो असोसिएशन व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन कुमार/कुमारी गटाकरिता निवड समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. मुक-बधिर विद्यार्थ्यांना खो-खो प्रशिक्षण देऊन खेळाची आवड निर्माण करण्याचे कार्य केले आहे. तसेच ग्रामीण भागातील गरजू खेळाडूंना खो-खोचे मार्गदर्शन देखील ते करत असतात. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *