विभागीय क्रीडा संकुल समिती अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

  • By admin
  • January 12, 2025
  • 0
  • 35 Views
Spread the love

क्रीडा विभागातील स्वप्नील तांगडे, बँकेचे सचिन वाघमारे, नितीन लाखोलेला अटक 

छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुल समितीच्या २१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बँकेच्या सहायक व्यवस्थापकासह क्रीडा विभागातील कनिष्ठ लिपिक स्वप्नील तांगडे, बँकेचा तत्कालीन अधिकारी सचिन वाघमारे आणि नितीन लाखोले अशा तिघांना अटक केली आहे.

विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यावरून २१ कोटी ५९ लाख रुपयांचा अपहार झाला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी मोठी कारवाई करत क्रीडा विभागातील कनिष्ठ लिपिक स्वप्नील तांगडे, बँकेचा तत्कालीन अधिकारी सचिन वाघमारे आणि नितीन लाखोले यांना शनिवारी अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या तिघांना या अपहार प्रकरणात संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. कामात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करुन घोटाळ्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.
या संशयित आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार यांच्या कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर कोर्टाने १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले. या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याची कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता त्याचा पीसीआर १४ जानेवारीपर्यंत वाढवला आहे.

विभागीय क्रीडा संकुल समिती अपहार प्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. सरकारी वकील समीर बेदरे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक अवचार यांनी कोर्टात बाजू मांडली. विभागीय क्रीडा संकुलातील कनिष्ठ लिपिक स्वप्नील तांगडेकडे संकुल समितीच्या बँक खात्याची जबाबदारी होती. हर्षकुमारच्या बनावट नोंदी घेतल्याचे दिसून आले असताना तांगडे याने दुर्लक्ष केल्याचा ठपका त्याच्यावर आहे. तसेच इंटरनेट सुविधा घेताना नेट बँकिंगचा फॉर्म भरुन घेणे बंधनकारक असताना लाखोले याने तो भरुन घेतला नाही. पूर्वीच्या लिपिकाच्या नंबरवर नोंदणी होती. नोंदणीकृत मोबाइलधारकाला फोन करुन माहिती घेणे बंधनकारक होते. मात्र, त्याने ही सुविधा सुरू करण्यासाठी सहायक व्यवस्थापक वाघमारेकडे फॉर्म दिला. बँकेचा लिपिक लाखोलो व सहायक व्यवस्थापक वाघमारे हे चेकर व मेकर म्हणून असताना क्रीडा उपसंचालक कार्यालय समितीचे कोणतेही पत्र नसतानाही दोघांनी इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध करुन दिली असे सरकारी वकिलांकडून सांगण्यात आले.

वाघमारे व लाखोलेच्या बाजूने अॅड प्रशांत निकम यांनी युक्तिवाद केला. बँकेचे व्यवहार पाहण्यासाठी लागणारा युजर आयडी व पासवर्ड हे क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांचे पत्र पाहिल्यानंतर दिले. यात बँक कर्मचाऱ्यांचा दोष नसल्याचे सांगितले. तसेच बँक अधिकाऱ्यांना मुख्य आरोपीने प्रत्यक्ष लाभ दिल्याचा एकही पुरावा नाही. या प्रकरणात सबनीस यांची फसवणूक झाली आहे. मग त्यांनी का तक्रार केली नाही असा युक्तिवाद करण्यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *