
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे शाम भोसले यांची मागणी
पुणे : सन २०१३ पासून आंतर शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आलेल्या ४४ क्रीडा प्रकारांना क्रीडा गुण सवलत देण्यात यावी अशी मागणी शालेय खेळ-क्रीडा संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे.
शालेय खेळ-क्रीडा संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना या मागणीचे लेखी निवेदन दिले. या निवेदनात शाम भोसले यांनी म्हटले आहे की, ‘सन २०१३ मध्ये तत्कालीन क्रीडा मंत्री व तत्कालीन क्रीडा आयुक्त यांच्या मान्यतेने एकूण ४४ क्रीडा प्रकारांना शालेय क्रीडा स्पर्धेत विनाअनुदान व विना गुणांकन प्रायोगिक तत्वावर शालेय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट करुन घेतले होते. कालांतराने क्रीडा गुण व इतर क्रीडा विषयक सुविधा देण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
सन २०१३ पासून आजतागायत शासनाच्या सर्व अटी नियमांचे पालन करुन ४४ क्रीडा संघटनांनी शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले आहे आणि आजही करत आहेत. सन २०१३ पासून ४४ क्रीडा प्रकारांना क्रीडा गुण सवलत मिळावी याकरिता शासन दरबारी वारंवार पत्रव्यवहार शालेय खेळ-क्रीडा संस्था महाराष्ट्र राज्य ही संघटना करत आहे. शासनाकडून ४४ क्रीडा प्रकारांबाबत मागवलेली सर्व माहिती वेळोवेळी क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालयातील अपर मुख्य सचिव यांना पाठवलेली आहे असे शाम भोसले यांनी निवेदनात नमूद केले आहे.
४४ क्रीडा प्रकारांना क्रीडा गुण सवलत देण्यात यावी या मागणीसाठी सातत्याने संघटना पाठपुरावा करत आहे. यापूर्वी तत्कालीन क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, सुहास दिवसे व क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी क्रीडा गुण सवलत देण्याची शिफारस केली आहे. या संदर्भात सर्व पत्रव्यवहार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी ज्ञानेश्वर आव्हाड यांच्याकडे आहे. कक्ष अधिकारी ज्ञानेश्वर आव्हाड यांच्याकडे वर्षभरापासून वारंवार समक्ष भेटून विनंती करुनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे ४४ क्रीडा प्रकारातील महाराष्ट्र राज्यातील ४ लाखांपेक्षा अधिक खेळाडू क्रीडा गुणांकन व क्रीडा विषयीच्या सुविधांपासून वंचित आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित दादा पवार यांनी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून ४४ क्रीडा प्रकारातील खेळाडूंना क्रीडा सवलत गुण द्यावेत अशी मागणी शाम भोसले यांनी निवेदनातून केली आहे.