
छत्रपती संभाजीनगर : जळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये कन्नडची खेळाडू समृद्धी प्रवीण शिंदे हिने सांघिक सुवर्णपदक पटकावले.
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या संघामध्ये हस्ता (तालुका कन्नड) येथील राधाबाई माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची खेळाडू समृद्धी प्रवीण शिंदे हिचा समावेश होता.
महाराष्ट्र संघाने दिल्ली संघाला पराभूत करून ही स्पर्धा जिंकली. या सुवर्ण कामगिरीबद्दल तालुका क्रीडा संकुल समिती अध्यक्ष व आमदार संजना ताई जाधव यांच्या हस्ते समृद्धी शिंदे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संजना ताई जाधव म्हणाल्या की, ‘कन्नड तालुक्यातील खेळाडूंसाठी मी कधी पण काहीही असले तरी खेळाडूंसाठी तत्परतेने मदत करण्याचे काम करणार आहे. मला समृद्धीच्या सुवर्ण यशाचा अभिमान आहे. पहिली महिला खेळाडू म्हणून समृद्धी शिंदेने राष्ट्रीय पदक जिंकले. तिच्या कामगिरीचा मला खूप मनस्वी आनंद होत आहे.’
या प्रसंगी पंचायत समिती सदस्य किशोर पवार, माजी सरपंच राहुल पाटणी, राम पवार, तालुका क्रीडा संकुल समिती सदस्य प्रवीण शिंदे, खो-खो खेळाचे जिल्हा पंच रविकुमार सोनकांबळे आदी उपस्थित होते. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, डॉ फुलचंद सलामपुरे, महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे सहसचिव गोकुळ तांदळे, डॉ उदय डोंगरे, तालुका क्रीडा अधिकारी सचिन पुरी, प्रा राकेश खैरनार, गणेश बेटूदे, संतोष अवचार, भीमा मोरे, सचिन बोर्डे, राधाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक किशोर चोंदे, कृष्णा घुगे, विजय सिंग बारवाल, मुक्तानंद गोस्वामी, श्याम खोसरे, राकेश निकम, वसीम शेख, करण राठोड, सचिन शेळके आदींनी अभिनंदन केले आहे.