
अंडर १९ क्रिकेट सामन्यात ३४६ धावांची वादळी खेळी, स्मृती मानधनाचा विक्रम मोडला
मुंबई : मुंबईची १४ वर्षीय सलामीवीर इरा जाधव ही १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
१९ वर्षांखालील महिला एकदिवसीय करंडकात मुंबईकडून फलंदाजी करताना इरा जाधवने एक विक्रम रचला आणि १९ वर्षांखालील महिलांमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनली. या बाबतीत इराने भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाला मागे टाकले.
अलूर क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या सामन्यात इराने मेघालयच्या गोलंदाजांना धुडकावून लावले आणि तिच्या मॅरेथॉन इनिंगमध्ये ४२ चौकार आणि १६ षटकार मारले. इरा १५७ चेंडूत नाबाद ३४६ धावा करत राहिली आणि तिच्या दमदार खेळीमुळे मुंबईने ५० षटकांत ३ बाद ५६३ धावा केल्या. कोणत्याही वयोगटातील स्पर्धेत भारतीय महिलांच्या स्थानिक संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. एवढेच नाही तर, बीसीसीआयने आयोजित केलेल्या कोणत्याही मर्यादित षटकांच्या स्पर्धेत तिहेरी शतक झळकावणारी इरा जाधव ही पहिली खेळाडू आहे. आतापर्यंत कोणत्याही पुरुष खेळाडूला असा पराक्रम करता आलेले नाही.